नाशिकमध्ये महायुतीचे टेन्शन वाढले – वंचित कडून मराठा क्रांती मोर्चाचा उमेदवार
नाशिक – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून आज उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. वंचितकडून नाशिकसाठी मराठा आंदोलनातील आक्रमक चेहरा करण गायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दिंडोरी पाठोपाठ जळगावातून उमेदवार बदलण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली आहे.
राज्यातील बहुतेक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार देण्यात येत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातदेखील वंचितकडून उमेदवार दिला जाणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. नाशिकचा मतदारसंघाची ओळख ही मराठा बहुल मतदारसंघ अशी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरूनराजकारण तापलेले असतानाच नाशिकमध्ये मराठा समाजाकडून उमेदवार दिला जाईल, अशी शक्यता होती. मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मराठा समाजाचे नेते करण गायकर इच्छुक होते. मराठा आंदोलनातील पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. यात वंचितकडून मराठा उमेदवार म्हणून करण गायकर यांना उमेदवारी देण्यावर चर्चा झाली होती. आज अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांच्या नवव्या यादीत करण गायकरांच्या नावाची घोषणा केली आहे.