आबू आझमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर
मुंबई : पुढील तीन ते चार दिवसात समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि अबू आझमी यांची रविवारी रात्री उशिरा मुंबईत बैठक झाली आणि या बैठकीत पक्षप्रवेशाचा अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती आहे.
महा राष्ट्रातील भाजपचा एक महत्त्वाचा नेता अबू आजमी यांच्या प्रवेशासाठी प्रयत्नशील असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. अबू आझमी भाजपमध्ये प्रवेश करू शकत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दोनच दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे भिवंडीतील आमदार रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा देत समाजवादी पक्षामध्ये दलालांचं राज्य आल्याची टीका केली होती. त्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला होता. मात्र रईस शेख यांचा निशाणा हा अबू आझमी यांच्यावर असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून अबू आझमी समाजवादी पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांनी आता समाजवादी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. अबू आझमी यांनी जर राष्ट्रवादीत प्रवेश केला तर तो समाजवादी पक्षासाठी मोठा धक्का असणार आहे.
या आधी अबू आझमी हे शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती. पण प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यात प्राथमिक चर्चा झाली असून ते राष्ट्रवादीत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आबू आझमी जर राष्ट्रवादीत आले तर ईशान्य मुंबई लोकसभेसाठी त्याचा फायदा महायुतीला होणार आहे.