महाविकास आघाडीचा शनिवारचा महाराष्ट्र बंद मागे – काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करणार
मुंबई – देशातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता . मात्र या निर्णयाच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर शनिवारचा बंद बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने सांगितल्यामुळे शनिवारचा बंद मागे घेण्यात आला आता केवळ तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करणार आहेत
महाविकास आघाडीने शनिवारी (दि.२४) पुकारलेला बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. अखेर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बंद मागे घेत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले
महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर न्यायालयाने बंद बेकायदेशीर ठरवत आज परवानगी नाकारली. यावर ठाकरे म्हणाले की, उच्च न्यायालयाचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही. परंतु आम्ही या निर्णयाचा आदर राखतो. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची ही वेळ नाही. लोकांनी भावना व्यक्त करू नयेत का ? असा सवाल करून न्यायालयाने गुन्हेगारांना शिक्षा देण्याबाबत अशीच तत्परता दाखवावी, अशी खोचक टिप्पणी ठाकरे यांनी केली.
उद्या बंदऐवजी महाविकास आघाडीचे नेते मूक आंदोलन करतील. राज्यभरात शिवसैनिक काळ्या फिती लावून झेंडे दाखवून आंदोलन करणार आहेत. उद्या अकरा वजाता शिवसेना भवन येथे काळ्या फिती लावून मूक आंदोलन केले जाईल. उद्याचा बंद मागे घेत असलो, तरी आंदोलन थांबणार नाही. शिवसेना भवनासमोरील चौकात मी स्वत: आंदोलन करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.