मतमोजणील सुरुवात निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष- महायुती की महाविकास आघाडी?
मुंबई/महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी झालेल्या निवडणूक निकालाची आज उत्सुकता संपणार आहे. कारण सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली असून, संध्याकाळी सात वाजेपर्यंत सर्व २८८ जागांचे निकाल हाती येतील. परंतु हे निकाल हाती येण्यापूर्वीच काही राजकीय नेत्यांनी पुड्या सोडायला सुरुवात केली आहे .नारायण राणे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर शरद पवार महायुतीला पाठिंबा देतील असे सांगून टाकले आहे. तर प्रहार चे बच्चू कडू तिसऱ्या आघाडीला महायुती सोबत आणतील असे भाजपच्या काही नेत्यांनी सांगायला सुरुवात केली आहे. परंतु या सगळ्या पुड्या आहेत यात कोणतेही तथ्य नाही. अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
यावेळी ची निवडणूक अत्यंत खास होती.त्याचे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्यानंतर प्रथमच ही निवडणूक होत आहे . त्यामुळेच निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून विजयाचे दावे केले जात आहे. परंतु प्रत्यक्ष महाराष्ट्रातील मतदान कोणाच्या बाजूने कौल देणार हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. मात्र दोन्हीकडून दावे प्रति दावे केले जात आहे. या निवडणुकीत मुंबईतील ३६ जागांवर विशेष लक्ष आहे. कारण या ३६ जागा चा निकाल आगामी मुंबई महानगरपालिका च्या निवडणुकीची दिशा ठरवणार आहे .मुंबईतील ३६ जागांसाठी खास करून भाजपा आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार चुरस आहे. मुंबईतील काही महत्त्वाचे मतदार संघ या निवडणुकीतील नेत्यांचे भवितव्य ठरवणारे आहे. यामध्ये वरळी, माहीम ,शिवडी, मुंबईदेवी, ऑपेरा हाऊस, बोरीवली, चांदवली , मालाड,विक्रोळी,यासारख्या महत्त्वाच्या मतदार संघाचा समावेश आहे. या निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी भरभरून मतदान केले असल्याचे समजते. मात्र तरीही मुंबईमध्ये केवळ ५०.९८% इतकेच मतदान झाले होते. त्यामुळे मुंबईचा कौल कोणाच्या बाजूने लागणार त्या आज संध्याकाळपर्यंत कळेल. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात दोन्ही आघाड्यांनी ताकद लावली होती. खास करून विदर्भात भरपूर मतदान झालेले आहे गडचिरोली सारख्या नक्षलवादी जिल्ह्यात ७२ टक्के मतदान झाले. त्यामुळे इथे मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला किंवा वाढलेले मतदान कोणाच्या फायद्याचे ठरणार आहे हे आज निकालात कळणार आहे. जर या निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला तर महायुतीचे काही नेते महाविकास आघाडीतील आमदारांना फोडून आपले सरकार वाचवण्याचा प्रयत्न करतील. अशी शक्यता आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेसारख्या महत्त्वकांक्षी योजनेचा महायुतीला किती फायदा झाला हे आजच्या निकालात दिसून येणार आहे. मात्र या निवडणुकीचे खरे भवितव्य विदर्भातील ६२ जागा आणि मुंबईतील ३६ जागा या ९८ जागाच ठरवणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर अजित पवार आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा भाजपच्या लोकांनी प्रचार केला नसल्याचे दिसून आले होते .त्याचबरोबर अनेक ठिकाणी महायुतीमध्ये भाजपच्या विरोधात शिंदेंची शिवसेना आणि शिंदेच्या विरोधात अजित पवार यांची राष्ट्रवादी असे चित्र बघायला मिळाले होते. या निवडणुकीत भाजपचे तब्बल १९ बंडखोर उमेदवार उभे होते त्यातील बहुतेक स्ट्रॉंग असल्याने ते निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता या बंडखोरांना पटवण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू झालेले आहे. अशा वेळी आजच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार बघायला मिळणार आहे. या निवडणुकीत जरांगे पाटलांचा अक्षरशः पोपट झाला होता. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत जसा मराठा फॅक्टरचा परिणाम जाणवला तसाच .या विधानसभेच्या निवडणुकीत मराठा फॅक्टरचा परिणाम जाणवनार की नाही हे आजच्या निकालात दिसून येणार आहे .