नीट परीक्षेचे लातूर कनेक्शन उघडकीसनांदेड मधून २ शिक्षकांना अटक
लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात दिवसागणिक नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच आज होणारी नीट पीजी परीक्षापुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयानं घेतला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात बिहार कनेक्शननंतर आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी दोन शिक्षकांना नांदेड एटीएसनं ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. दरम्यान, नांदेड एटीएसकडून दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरपर्यंत पोहोचले आहेत. नांदेडच्या एटीएस पथकानं लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतलं आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी या शिक्षकांची नावं आहेत. पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे.
वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेतघोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का? या दृष्टीनं तपास सुरू होता. शनिवारी रात्री नांदेड एटीएसच्या हाती हे दोघे शिक्षक लागले. दोघांनाही तात्काळ एटीएसकडून ताब्यात घेण्यात आलं.
लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील रहिवासी आहेत. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. तर लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. हे दोघेही लातूर येथे खाजगी कोचिंग क्लासेस चालवत होते अशी माहिती आहे. नांदेड एटीएसनं या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर क (शनिवारी) रात्रभर कसून चौकशी केली. त्यानंतर या दोघांनाही नांदेडकडे घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे.
नीट पीजी परीक्षार्थींसाठी मोठी बातमी आहे. आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. आज नीट पीजी परीक्षा पार पडणार होती, मात्र आता ही परीक्षा होणार नाही. नीट परीक्षेचा मुद्दा गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. अलिकडेच नीट परीक्षेमध्ये घोळ झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर नीट पीजी परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत शिक्षण विभागाने रविवारी होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली आहे

.