शिवडीतील सस्पेन्स कायम चौधरी की साळवी गुरुवारी निकाल
मुंबई – शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवडी विधानसभा मतदारसंघात कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, पहिल्या यादीत ठाकरे गटाकडून शिवडीतील उमेदवार घोषित न केल्याने कोणाला संधी मिळणार याबाबत सस्पेंस वाढला आहे. या मतदारसंघातून दोन जण इच्छूक आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ६५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पण शिवडी मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार अजून जाहीर झालेला नसल्याने सस्पेंस वाढला आहे. शिवडी विधानसभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सूकता आहे. कारण या मतदारसंघातून अजय चौधरी आणि सुधीर साळवी हे दोघेही इच्छूक आहेत. दोन्ही समर्थकांमध्ये यावरुन चांगलाच पोस्टर वॉर रंगला होता. पण जो मातोश्रीचा आदेश असेल तोच शिवडीचा उमेदवार अशा आशयाचे पोस्टर देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांचे समर्थक आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवडी विधानसभेत निष्ठेची मशाल धगधगणार असं अजय चौधरी यांच्या समर्थकांनी म्हटलं होतं. तर संघर्षात साथ जनतेची मला भिती नाही विरोधकांची असे पोस्टर सुधीर साळवी यांच्या समर्थकांकडून व्हायरल करण्यात आले होते.
अजय चौधरी हे ठाकरे गटाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. लालबागचा राजा मंडळाचे पदाधिकारी सुधीर साळवी हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.