भावाच्या मृत्यूचा बदला – ७ जणांची हत्या करून घेतला
पुणे – भीमा नदीत सापडलेले मृतदेह हे आत्महत्या नसून भावाच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी एका नराधमाने घडवलेले मोठे हत्याकांड आहे अशी भयंकर माहिती उघडकीस आली असून या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत सात जणांचे मृतदेह सापडल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी पाच आरोपी अटकेत आहेत त्यातील चार पुरुष तर एक महिला आरोपी आहे. अंधश्रद्धेचं कुठलंही कारण आतापर्यंतच्या तपासात समोर आलेलं नाही, अशी माहितीदेखील पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले, गंभीर प्रकार लक्षत घेता आम्ही अनेक पथक तयार केले होते. काही पुरावे समोर आले त्यातून लक्षात आलं की हा घातपात करुन त्यांचा खून करण्यात आला आहे. पाचही आरोपी नातेवाईक असून ते एकाच गावातील रहिवासी आहेत. आरोपी अशोक पवार यांचा भाऊ धनंजय पवार यांचा अपघातात मृत्यू झाला होता आणि त्याला कारणीभूत हे पवार कुटुंब होतं. त्याचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आली आहे. सगळे आरोपी हे एकमेकांचे भाऊ बहिणभाऊ आहेत.
अशोक पवार, श्याम पवार, शंकर पवार, प्रकाश पवार, कांताबाई जाधव, या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हे पाचही जण मृत कुटुंबियांचे नातेवाईक आहेत. मोहन पवार (४५), संगिता पवार (४०), राणी फुलवरे, श्याम फुलवरे, रितेश फुलवरे, छोटू फुलवरे, कृष्णा फुलवरे,अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.