शरद पवार आजही भाजप सोबत – प्रकाश आंबेडकर
र
मुंबई- शिवसेनेसोबत युती करणाऱ्या प्रकाश आंबेडकर याना महाविकास आघाडीत घेण्याबाबत हालचाली सुरु असतानाच आज प्रकाश आंबेडकर यांनी मविआचे संस्थापक शरद पवार हे भाजप सोबतच आहेत असे सांगून आघाडीत मोठी खळबळ उडवून दिली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले कि लोकशाही आणि स्वातंत्र्यांची गळचेपी करीत देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल होत आहे. हे रोखण्यासाठी राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी ( २३ जानेवारी ) केली. मात्र, अद्यापही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वंचित आघाडीबरोबर जाण्याबद्दल आपली भूमिका जाहीर केली नाही. अशातच प्रकाश आंबेडकरांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार आजही भाजपाबरोबर असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
‘एबीपी माझा’शी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं,” असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.