उत्तर मध्य मुंबईतून कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी
मुंबई – मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघाचा तिढा गेले काही दिवस महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दिसत होता. त्यापैकीच एक असलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी आता काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपाकडून मौन बाळगण्यात आले आहे.
कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार पूनम महाजन यांनी २०१४ व २०१९ मध्ये दोन वेळा विजय मिळवला. मात्र वरिष्ठांची नाराजी, पक्षांतर्गत वाद, तक्रारी आणि सर्वेक्षण अहवाल आदी कारणांमुळे महाजन यांना उमेदवारी घोषित होऊ शकलेली नाही. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी अनेकदा आग्रह करूनही त्यांनी आपल्याला रस नसल्याचे वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे. त्यामुळे भाजपाने अद्याप या मतदारसंघात कुणाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही.
