पुणे हिट एन्ड रन प्रकरण! बिल्डर विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयी कोठडी ! जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा
पुणे : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली आणि १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी जामिनासाठी अर्ज केला जाणार आहे अशी माहिती आरोपीच्या वकिलांनी दिली आहे.
विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवली आणि त्यामुळे दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. आता न्यायालयाने विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील विशाल अग्रवालसोबत सर्वच सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता विशाल अग्रवाल हे उच्च न्यायालयात जाऊ शकतात आणि जामीनासाठी अर्ज करू शकतात.
विशाल अग्रवालवर पुणे पोलिसांकडून आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. कलम २०१ अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात येणार. अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला ‘तू कार चालवत होता असं पोलिसांना खोटं सांग’ असं विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात येणार आहे
विशाल अगरवालवर आरटीओच्या तक्रारीनंतर कलम ४२० च्या अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोर्शे कारची नोंदणी झालेली नसताना त्याची नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्द्ल हा गुन्हा दाखल करण्यात येणार