पत्रकारांवरील हल्ले निंदनीय – राज्यपाल रमेश बैस
मुंबई,- राज्यात अलीकडच्या काळात पत्रकारांवरी झालेले हल्ले अतिशय निंदनीय असून, हल्लेखोर कितीही प्रभावशाली असतील, तरीही त्यांना कायद्यानुसार योग्य शासन झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी येथे केले. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोठेही स्थान नाही, असे राज्यपालांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ राज्यपाल बैस यांच्या हस्ते, पत्रकार संघाच्या सभागृहात प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. यंदा आचार्य अत्रे यांचे १२५ वे जयंती वर्ष आहे. देशात १९९५ नंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे मोठ्या प्रमाणात आली. गेल्या दशकात त्यासोबत डिजिटल व समाज माध्यमेदेखील आली; परंतु ही सर्व माध्यमे एकमेकांना पूरक ठरली आहेत, असे सांगताना माध्यम जागतिक क्रांतीनंतरदेखील वृत्तपत्रांनी आपली विश्वसनीयता टिकवून ठेवली आहे, असे राज्यपालांनी सांगितले. राज्यपाल पुढे म्हणाले की, ‘पत्रकार हे समाजाचे कान आणि डोळे असतात. ते लोकशाहीचे पहारेकरी व जनसामान्यांचे हितरक्षक असतात. आज माध्यमांना आपली प्रासंगिकता व निष्पक्षता टिकवून ठेवणे आव्हानात्मक आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी सामान्य जनतेशी निगडित बातम्या दिल्या पाहिजेत, तसेच बातम्या देताना ‘निवाडे’ देण्याची भूमिका टाळली पाहिजे.’
आचार्य अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळाला, याचा अतिशय आनंद आहे, असे विजय वैद्य यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे व कार्यवाह संदीप चव्हाण यांनी प्रास्ताविक केले; तर संयुक्त कार्यवाह विष्णू सोनवणे यांनी आभार मानले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे, ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या पत्रकारांच्या पाल्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.