मुख्यमंत्री भाजपचाच होणार ! मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यानं संधी मिळणार
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. या निवडणुकीत महायुतीने थेट २३० चा आकडा गाठला. या निकालानंतर आता महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यामुळे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी देखील आमदारांची रेलचेल वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यामुळे महायुतीने बैठकांचा सपाटा लावला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाचा पॅटर्न कायम राहणार आहे. महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे ही प्रमुख पद कायम राहणार आहे. भाजप महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा भाजपचाच असणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस यांना सत्तेत योग्य सन्मान दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.तसेच या नव्या सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मागच्या मंत्रिमंडळातील अनेक चेहऱ्यांना वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेतील माजी मंत्र्यांपैकी काही मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे. त्याचबरोबर वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.