ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

डाॅक्टर, मला नेमकं काय झालंय ?


वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग

एका वेगळ्या विषयावर आज लेख लिहितोय.
आपण आजारी आहोत हे कसं ओळखावं ? कोणत्या आजाराची लक्षण कशी ओळखायची ?
असे काही प्रश्न आणि त्याला मिळालेली उत्तरे यातून या लेख पुढे जाणार आहे.

  1. मी आजारी आहे का ?
    ज्यांच्या आजाराला 40/50 वर्ष झाली आहेत, अशा दवाखान्यात आलेल्या रुग्णाला जेव्हा मी विचारायच्या आधीच तो रुग्ण डायरेक्ट रोगाचे निदानच सांगतो, तेव्हाच समजून जातं, की हा बंदा रोगाच्या चक्रव्युहात पुरता अडकून गेलेला आहे.
    ” डाॅक्टर मला डायबेटीस आहे”
    “बीपीसाठी काहीतरी करा हो!”
    वैद्यजी, मला थायराॅईडचं औषध मिळेल का ?”
    गुरूजी, पीसीओडी साठी तुमच्या आयुर्वेदातील काही औषधं मिळतील का ?”
    “वैद्यराज पित्ताशयात खडा झालाय, आता डाॅक्टर म्हणताहेत, पित्ताशयच काढून टाकायचं ? मला तर जाम भीती वाटतेय… ?”

असे पेशंट आले आणि त्यांच्या तक्रारी सांगू लागले की, हसावं की रडावं कळतच नाही.
अशा रुग्णांना मी एक साधा प्रश्न विचारतो,
“तुम्हाला त्रास काय होतोय ?”
तो म्हणतो,
“रिपोर्टस केले की शुगर वाढलेली असते…..
रिपोर्टस केले की थायराॅईड वाढलेलं दिसतं…..
रिपोर्टस केले की एच बी कमी दिसतं.”
“तपासलं की प्रत्येक वेळी बीपी वाढलेलंच मिळतं.”
इ. इ.
त्यांना पुनः तोच प्रश्न मी विचारतो,
” तुम्हाला त्रास काय होतोय ?”
पुनः साशंकीत नजरेने ते तेच उत्तर देतात, “रिपोर्टस पाहून भीती वाटते.”
त्यांना पुनः तोच प्रश्न मी परत विचारतो,
“तुम्हाला त्रास काय होतोय ?”
शेवटी ते डोक्याला हात लावून उत्तर देतात,
” मला तसा त्रास काहीच जाणवत नाहीये… पण….”
आता त्यांच्या चेहेर्‍यावर संमिश्र भाव असतात.
मला नेमकं काय झालंय ? या प्रश्नामध्येच तो पुरता गुरफटून गेलेला असतो.
केवळ पेशंटस नाहीत, तर जास्ती वेळेस डाॅक्टरच जास्त कन्फ्युज होतात. ( आणि नंतर रुग्णाला डबल कन्फ्युज करतात ) ही वस्तुस्थिती आहे.

मी आजारी आहे, असं एकही लक्षण जर मला दिसत नसेल तर स्वतःला रोगाचं लेबल कशाला चिकटवून घेताय ?

रुग्ण : मग ते रिपोर्टस??
मी : आपल्याला रिपोर्टस नाॅर्मल ठेवायचे आहेत की स्वतःला नाॅर्मल व्हायचं आहे ?
रुग्ण: साहाजिकच मला नाॅर्मल व्हायचं आहे.
मी : मग रिपोर्टस करणं सोडून द्यावे जेव्हा एखादा आजार आपल्याला होतो, तेव्हा त्याची लक्षणं आपल्याला, आपलं शरीरच सांगत असतं. जसं आपल्याला ताप आहे की नाही ? हे आपल्याला थर्मामीटर न लावताच कळतं ना !
आपला एखादा सांधा दुखतोय का ?
आपलं डोकं दुखतंय का ?
चक्कर येतेय का ?
उलटी होतेय का ?
पोटात दुखतंय का ?
मला भूक लागतेय का ?
लघवीला जळजळ होतेय का ?
माझं पोटं साफ होतंय की नाही,
इ.इ. अनेक लक्षण आपली आपल्यालाच कळत असतात.
बरं यातलं एकही लक्षण कोणत्याही देशातल्या अतिप्रगत यंत्रालादेखील कळत नाही. भविष्यात कळणार देखील नाही.

या सारख्या लक्षणाना ‘क्लिनिकल अॅसेसमेंट’ म्हणतात. म्हणजे रुग्ण संवेद्य लक्षणं. म्हणजेच ‘मला काय होतंय’, हे आपलं शरीर मन आत्मा आणि इंद्रिय आपल्याला सांगत असलेले सिग्नल्स.
आणि हे सिग्नल अगदी सहज स्वतःचे स्वतःला ओळखता येतात. अगदी सहा महिन्याच्या बाळाला देखील भूक लागली की रडायचं आणि पोट भरलं की तोंडातली बाटली फेकून द्यायची, हे कळतंच ना ! हे शिकायला कोणत्या शाळेत जायची गरज नसते. डाॅक्टरांची तर नाहीच नाही.

एखाद्या रोगाचं निदान, म्हणजे डायग्नोसिस करणं हा त्या डाॅक्टरच्या अभ्यासाचा भाग असतो. रुग्णाचा खरंतर त्याच्याशी काहीही संबंधच असत नाही. ( आणि आयुर्वेदात रोगाचं निदान प्रत्येक वेळेस झालंच पाहिजे, असं बंधन नाहीच. प्रत्येक वेळी रोगाच्या नावाचे लेबल लावलेच पाहिजे असं नाही.
( न ही सर्व रोगाणाम नामोऽस्ति)
शेवटी उपाय कोणताही असो, रुग्णाला लवकरात लवकर बरं वाटणं जास्त महत्वाचं असतं.

न तु अहम् कामयेत् राज्यम्
न स्वर्गम् न पुनर्भवम्
कामयेत् दुःख तप्तानाम्
प्राणीनाम् आर्त नाशनम्
मला सर्व प्राण्यांच्या दुःखाचे, वेदनांचे निवारण करायचे आहे, हे माझे परम कर्तव्य आहे. अशी शपथ वैद्य लोक घेत असतात.

आयुर्वेद ही अशी चिकित्सा पद्धती आहे, जिचा उपयोग रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधक स्वरूपात आणि रोग झाल्यानंतर चिकित्सा स्वरूपात केला जातो. आणि त्यासाठी कोणत्याही पद्धतीचा पाश्चात्य विचार करण्याची गरज पडत नाही. ( ज्या काळी विज्ञान तंत्रज्ञान प्रगत नव्हते, त्याकाळात सुद्धा आयुर्वेदातील परीक्षण पद्धती सुद्धा अत्यंत सुधारीत होत्या. सर्व रोगांचे योग्य आणि खरे निदान केले जात होते. अगदी कावीळीपासून मधुमेह आणि कॅन्सर पर्यंत रोगाचे निदान साध्या साध्या शारीरीक तपासणीनुसार करता येत होते. जेव्हा प्रगत टॅक्नाॅलाॅजी आणि विज्ञानाचा आधार घेत, निदान करण्याच्या पद्धती विकसीत झाल्या, त्याचा गैरवापर करण्याकडे डाॅक्टरांचा कल वाढू लागला.
ग्राहक संरक्षण कायद्यामधे जेव्हा डाॅक्टरना सामावले गेले तेव्हा अधिक सावधपणे कागदावर रोगाला अधिकृत केले जाऊ लागले. डाॅक्टरच्या विश्वासापेक्षा, चार ओळींच्या छापील कागदाला जास्ती महत्त्व आले.

कसं असतं..
भारतात निरोगी कुत्र्यांना ठार मारणं हा कायद्याने गुन्हा आहे. पण एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारणे हा मात्र गुन्हा ठरत नाही.
… पण
… पण… तुम्हाला कागदावर सिद्ध करता आलं पाहिजे, की तो कुत्रा पिसाळलेला होता….
मग तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. खुशाल गोळ्या घाला.
अगदी हीच पद्धत माणसाना रोगी बनवण्यासाठी वापरली जातेय, असं लक्षात येतंय.
केवळ कागदावर रक्तातली साखर वाढलेली दिसली की त्याला आयुष्यभर गोळ्या घालता येतात, हे जेव्हा मेडीकल इंडस्ट्रीच्या लक्षात आले तेव्हा प्रत्येक रुग्णाला पॅथाॅलाॅजिकल टेस्ट मधून पार पडावेच लागणार.
कोरोनाच्या काळात हे प्रकर्षाने लक्षात आले एकही लक्षण नसलेले रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह यायला सुरवात झाली. एकही लक्षण नसलेल्या कोरोनासाठी असलेली सर्व औषधे ठोक ठोक ठोकली. आणि न जाणारे रुग्ण देखील आमच्या हातून, डोळ्यादेखत स्वर्गवासी झाले,
याचे वाईट वाटते.
फक्त आणि फक्त त्यांना कागदावर रुग्ण बनवले गेले.
ही बनवाबनवी लक्षात येईपर्यंत बरेच पाणी डोक्यावरून निघून गेले होते.
तपासणी कीटमधील घोटाळा कोरोनाची साथ पसरविण्यात कारणीभूत होता, हे लक्षात आल्यावर सामान्य जनतेने तपासणी, म्हणजे रिपोर्टस करायचेच सोडून दिले आणि साथ आपोआपच आटोक्यात आली…

तश्याच प्रकारे गेल्या कित्येक वर्षांपासून डायबेटिस, बीपी, थायराॅईड, कॅल्शियम लेव्हल, कोलेस्टेरॉल इ. अनेक ( बोगस आणि अनावश्यक ) तपासण्या करून एकही लक्षण नसलेल्या रुग्णांना आयुष्यभर औषधे खावी लागत आहेत. आणि नकोत ती पथ्य पाळून, आयुष्यातली अत्यंत महत्वाची काही वर्ष आनंदापासून वंचित रहावी लागले आहे. आणि खात असलेल्या अनावश्यक औषधांचे साईड इफेक्ट्स सांभाळत, कर्माचे भोग म्हणत, पुढच्या आयुष्याची कालगणना करीत रहाणे, नशीबातच होते, म्हणत राहायचे !

  1. मग मला काय आजार आहे ? हे मी कसं ओळखावं ?

शरीराच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवावे कोणत्या अवयवात कोणते बदल होत चालले आहेत, हे जाणीवपूर्वक बघावे.
काही बदल शारिरीक स्तरावर, काही मानसिक स्तरावर तर काही अध्यात्मिक स्तरावर असतात. तज्ञ शासनमान्य रजिस्टर्ड वैद्याकडूनच त्याचे योग्य निदान करून घ्यावे. त्यासाठी कोणत्याही प्रयोगशालेय तपासण्यावर अवलंबून रहावे लागत नाही, हे पण लक्षात घ्यावे.
या सर्व प्रयोगशाळेतील तपासण्या हे आपल्याला रोगी बनवण्याचे सापळे तर ठरत नाहीत ना ? याची खात्री करावी.

  1. कोणत्या रोगाची कोणती लक्षणे असतात ?
  • सामान्य माणूस म्हणून हे खरंतर समजून घेऊच नये. अज्ञानात सुख असते. रोगाविषयी संपूर्ण ज्ञान अजून आजच्या विज्ञानाला करताच येत नाही. म्हणूनच प्रत्येक पॅथाॅलाॅजिकल रिपोर्टसवर खाली एक वाक्य छापलेले असते, “प्लीज कोरिलेट क्लिनिकली !”

4.कोणता डाॅक्टर खरं बोलतोय, कोणता डाॅक्टर खोटं बोलतोय, हे कसं ओळखावं ?

  • आपलं शरीर हेच उत्तम डाॅक्टर आहे. आपल्या अवयवांशी आपण आतून संवाद साधला तर हे अवयव आपल्याशी बोलतात. आपल्याला काय होतंय हे आपल्याला आतुन सांगतात.
  1. कोणते रिपोर्टस खोटे आहेत, हे आपल्याला कसं कळणार ?
  • आपलं शरीर आपल्याशी कधीही खोटं बोलणार नाही. जे असेल तेच आपल्याला सांगितलं जातं. रिपोर्टस मात्र खोटं बोलू शकतात. म्हणून तर तीन लॅबचे रिपोर्टस एकच अहवाल देत नाहीत. एकाच वेळेस, एकाच रुग्णाचे केलेले तीन लॅबचे रिपोर्टस जसे वेगळेच अहवाल देतात, तसे एकाच रुग्णाचे, एकाच लॅबमधे, तीन वेळेस तपासलेले रिपोर्टस वेगळेच असतात. एवढेच नाही, तर एकाच वेळी काढलेल्या रक्ताचे , एकाच लॅब मधे केलेले रिपोर्टस पण वेगळे असतात !
    या खोटेपणाला काय म्हणावे ?
    शास्त्रीय गोड भाषेत याला “टेक्निकल मिस्टेक” म्हणतात.

6 . मग माझी साखर वाढलेली आहे किंवा कमी आहे, की नाॅर्मल आहे, हे मला कसे कळेल ?

  • पुनः एकदा तेच उत्तर देईन..
    अज्ञानात सुख असते. आपल्याला जर उर्वरीत आयुष्य आनंदात आणि निरोगी घालवायचे असेल तर एकच वाक्य लक्षात ठेवायचे… डाॅक्टर आणि लॅबपासून पासून सुरक्षित अंतरावर रहायचे. आणि अशा वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा, ज्यांचा पाश्चात्य लॅबवर आणि अभारतीय पॅथाॅलाॅजिकल टेस्टवर विश्वास नसेल.

7 असे डाॅक्टर कुठे मिळणार ?

  • आपला शरीरस्थ ईश्वर हा सर्वात मोठा डाॅक्टर आहे. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून असावे .
    ठेविले अनंते तैसेची असावे, चित्ती असावे समाधान.
  1. तुम्ही सांगताय ते पटतंय पण आचरणात कसं आणायचं ? आणि जगण्याचे काही नियम तर असतीलच ना !

हो जगण्याचे नियम जे आयुर्वेदात लिहिलेत ते अन्य कोणत्याही पॅथीमधे मिळणार नाहीत. जसे दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या, आहाराचे नियम, व्यायामाचे नियम, हे तर पाळावेच लागतात. स्वतः आचरणात आणावे लागतात. म्हणजे शरीराचे आरोग्य टिकते.
मनावर, स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवावा. सतत वर्तमानात रहावं, आनंदात रहावं. स्वतःच आनंद निर्माण करावा. म्हणजे मानसिक आरोग्य चांगलं रहातं.

जसा एखाद्या घराचा स्वामी आपल्या स्वतःच्या घराचे कधीही नुकसान करत नाही, उलट जेवढं जपता येईल, तेवढं जपण्याचा प्रयत्न करतो, तसंच शरीराचा स्वामी, म्हणजेच “मी”, आपले कधीही नुकसान करणार नाही. “तो” आतून जे काही करत असतो, ते आपल्या हिताचेच असते. आपले हित कशात आहे, हे आपल्यापेक्षा “त्याला” जास्ती चांगले कळते. हे समजून घेत, त्या परमश्रेष्ठ भगवंताचे नामस्मरण करावं, म्हणजे अध्यात्मिक आरोग्य मिळतं.

“तो” आहे, यावर निश्चिंत असावे.
निश्चित निश्चिंत असावे.
या निश्चित शब्दातील टिंबावर विश्वास ठेवावा.
नाहीतर चिंता या शब्दातील टिंब काढले तर चितेत रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही.
वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!