आयजीच्या जीवावर बायजी उदार
लाडकी बहीण योजना ही कोणत्याही दृष्टिकोनातून महाराष्ट्राला परवडणारी नव्हती. पण केवळ महिलांच्या मतांवर डोळा ठेवून ही योजना राबवली जात आहे. पण ही योजना राबवताना श्रेय वादाचे जे घाणेरडे राजकारण सुरू झालेले आहे, ते अत्यंत कीळसवाने आहे. महायुती मधील राष्ट्रवादीचा अजित पवार गट ,शिवसेनेचा शिंदे गट ,आणि भाजपा यांच्यात लाडक्या बहिणी योजनेचे श्रेय घेण्यावरून अक्षरशा लढाई सुरू झालेली आहे .वास्तविक सरकारी योजना म्हटली की, त्या सरकारमध्ये सामील असलेल्या सर्व पक्षांचे त्या योजनेमध्ये श्रेय असते. आणि हे ठाऊक असताना महायुतीतील तिन्ही पक्ष आणि त्यांचे अंधभक्त कार्यकर्ते, लाडकी बहीण योजनेच्या पोस्टरवर आपापल्या नेत्याचे नाव आणी फोटो लावून, ही योजना जणू काही त्याच्याच नेत्याने आणली, आणि त्याचां तो नेता, खिशातून पैसे टाकून ही योजना राबवणार आहे असा देखावा निर्माण केला जात आहे. खास करून अजित पवारांचे कार्यकर्ते याबाबत खूप आक्रमक आहेत .पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अजित दादांच्या कार्यकर्त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पोस्टर लावून, त्यावर फक्त अजित पवारांचा फोटो छापून या संपूर्ण योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू केल्याने, महायुतीतील इतर दोन पक्ष भडकलेत.अर्थात त्यांना राग येणे स्वाभाविकच आहे. कारण अजित दादाचा राष्ट्रवादी पक्ष, या योजनेचे एकट्याने श्रेय कसा काय घेऊ शकतो? असा इतर दोन पक्षांच सवाल आहे. त्यामानाने या श्रेय वादाच्या लढाईत भाजपाचे लोक फारसे कुठे दिसत नाहीत. परंतु शिंदे आणि अजित पवार यांचे कार्यकर्ते अक्षरशः हमरीतुम्रिवर आलेले आहेत. प्रत्येकाला ही योजना आपल्याच नेत्यांनी आणली असे दाखवून द्यायचे आहे. परंतु या योजनेमुळे सरकारचे किती नुकसान झालेले आहे, आणि त्याचे परिणाम भविष्यात महाराष्ट्राला कशाप्रकारे भोगावे लागणार आहेत, याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. अर्थात राजकीय अंधभक्तना तेवढी अक्कल असेल तर बोलतील ना! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला दर महिन्याला ४५ हजार कोटींची तरतूद करावी लागते .परिणामी विकासाच्या अनेक योजना रखडल्या आहेत .दुसऱ्या खात्याचा निधी या लाडक्या बहिणीवर खर्च केला जात आहे. कर्जाचे हप्ते थकलेत. साडेसात लाख कोटींचे कर्ज आता 8 ते 9 कोटींवर जाणार आहे. आणि ते फेडण्यासाठी जनतेच्या खिशात हात घातला जाणार आहे. जनतेवर मोठ-मोठे कर लादले जाणार आहेत. महागाईचा आणखी आगडोब उसळणार आहे. परंतु महायुतीतील अंध भक्तांना हे अजिबात दिसत नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजना आम्ही आणली, आणि त्यामुळे महिलांचा कसा फायदा झाला, याचा ते प्रचार करण्यात गुंतले आहेत. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक महिलांनीही नापसंती व्यक्त केली आहे .कित्येक महिलांनी तर सोशल मीडियावर या योजनेची चिरफाड केली आहे. अशा प्रकारच्या योजना आणण्यापेक्षा महिलांना रोजगार उपलब्ध करून द्या. किंवा घरगुती सामानावर जी प्रचंड दरवाढ झालेली आहे ती कमी करा. अशा मागण्या कित्येक महिलांनी केलेल्या आहेत .परंतु त्याकडे कोणाचे लक्ष नाही. फक्त लाडक्या बहीण योजनेचे श्रेय उपटण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्ष प्रयत्न करीत आहेत .विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे, त्यामुळे त्याना वाटते की लाडकी बहीण योजनेमुळे आपली सत्ता टिकेल. पण तसे कदापि होणार नाही. कारण लाडकी बहीण योजनेतील सरकारचा तोटा, आणि भविष्यातील आर्थिक संकटे, याची सर्वांना चाहूल लागलेली आहे.कारण आजकाल लोक हुशार झालेत .कोणते सरकार राजाचा विकास करू शकते, कोणत्या सरकारमुळे राज्याची प्रगती होऊ शकते, कोणत्या सरकारमुळे देशातील माय भगिनींना संरक्षण मिळू शकते, हे आता लोकांनाही कळून चुकलेले आहे. त्यामुळे अशा थातूरमातूर योजना आणायच्या, आणि त्याचे श्रेय उपटण्यासाठी पोस्टरबाजी करायची, हे काही बरोबर नाही. आणि त्यातून महायुतीला फार मोठा फायदा होईल असे समजणे म्हणजे मूर्खांच्या नंदन वनात वावरण्यासारखे आहे .अर्थात ते काही असो पण श्रेय वादाची ही लढाई, विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येईल तशी तशी आणखी तीव्र होणार आहे. कदाचित याच लढाईमुळे महायुती फुटू शकते. कारण महायुतीतील प्रत्येक पक्ष लाडक्या बहिणीसाठी हातघाईवर आलाय .प्रत्येकाला लाडक्या बहिणी योजनेचे श्रेय आणि त्या श्रेयातून मिळणारी मते हवी आहेत .त्यामुळे आपणच लाडकी बहीण योजना आणली, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु या प्रयत्नातूनच महायुतीला सुरुंग लागेल. त्यामुळे लाडकी बहीण योजना हा महायुतीसाठी आधार ठरण्याएवजी एक मोठा खड्डा ठरणार आहे.