हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा- उध्दव ठाकरे
मालेगाव/ सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या आजच्या उद्धव ठाकरे यांची सभा मालेगाव शहरात झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे भाजप सरकारवर निशाणा साधत शेतकऱ्यांना सरकारने वेठीस धरत असल्याची टीका केली. यावेळी शिंदे गटातील नेत्यांसह राज्याच्या राजकारणावर भाष्य केले. मात्र राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भाषणावर मात्र बोलणे टाळले.
उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, नाशिकच्या शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी मुख्यमंत्र्यांना रक्तानं पत्र लिहल. साहेब माझ्या वावरात या, कांद्याला भाव द्या, अन्यथा अग्निडाग समारंभ करतो, मुख्यमंत्री तुम्ही शेतकरी पुत्र आहात, केंद्रातील जे शेतकरी धोरण आहे, ते शेतकरी विरोधी असून त्याविरुद्ध आवाज उठवा, मात्र तसे झाले नाही, अन मुख्यमंत्री आले नाहीत, साधं हे पत्रही वाचलं नाही, भाषण वाचता येतात, मात्र पत्र वाचता येत नाहीत, यानंतर शेतकऱ्यांने अडीच एकरवरील कांद्याला आग लागली, होळीच्या दिवशी या शेतकऱ्यांने कांद्याला अग्निडाग दिला. दुसरा एक शेतकरी रतन भागवत यांनी देखील वावरात कांदा लागवड करत उत्पादन घेतले होते. भरपूर कांदा झाला, मात्र भाव मिळाला नाही. त्यांच्या मुलीचं लग्न होत ते लग्न पुढं ढकलाव लागल. अशी अवस्था राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनो माझ्या प्रश्नांना आधी उत्तर देण्यापेक्षा शेतकऱ्यांना उत्तर द्या, अशा शब्दात सरकारला धारेवर धरले.
ते पूढे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काय मदत दिली नाही ते सांगा? महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं पहिलं पाऊलं उचललं. मात्र आज जिल्ह्यात अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मुख्यमंत्री शेतकरी आहेत, दिवाळीच्या वेळी आपण पाहिलं की, मुख्यमंत्री शेतात रमले, मात्र यांच्या शेतात दोन दोन हेलिपॅड, मुख्यमंत्री हेलिपॅडने शेतात जातात, अन माझा शेतकरी रात्री अपरात्री शेतात जातो, अनुचित प्रकार घडतात, वीज नसते, शेत मालाला भाव नाही, मुलींचे लग्न अडकलेत अन् मुख्यमंत्री शेतात रमतात, मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर यायला त्यांना वेळ नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.