ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
Businessताज्या बातम्यामुंबई

चारकोप, गोराई स्वयं पुनर्विकासाचे हब होतेय

भूमिपूजन सोहळ्यात आ. प्रविण दरेकरांचे विधान

मुंबई- भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते आज कांदिवली, चारकोप येथील ‘राकेश’ गृहनिर्माण सहकारी संस्थेचा स्वयंपुनर्विकासांतर्गत भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी चारकोप, गोराई हे स्वयंपुनर्विकासाचे हब होतेय, मुंबईला आदर्श घालून द्यायचा आहे, असे प्रतिपादन दरेकर यांनी केले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, माजी नगरसेविका संध्या दोशी, आर्किटेक हर्षद मोरे, व्यंकटेश कामत, ऍड. अखिलेश चौबे, नगरसेवक श्रीकांत कवठणकर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले की, माझ्या आयुष्यातील आनंदाचे पर्व सुरु झालेय असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. गेल्या १५-२० वर्षांपासून इमारतीचा पुनर्विकास गृहनिर्माण संस्थेने स्वतःच स्वतःचा करावा अशा प्रकारचा एक विषय घेऊन मी एक चळवळ उभी केली. त्यावेळेला ना कुठले धोरण, ना कुठले राजकीय किंवा सरकारचा राजश्रय. पण माझ्या मनात उमेद कायम होती की हे होऊ शकते तर हो होऊ शकते. बिल्डर असे कुठले तंत्रज्ञान वापरतो. आपण सर्वसामान्य माणसं बिल्डरकडे एवढ्यासाठी जातो की, तो पैशाची व्यवस्था करतो. पैसा हीच जर अडचण असेल, मुंबईतील गृहनिर्माण संस्था आमच्या सभासद असतील, शेअर होल्डर, मालक असतील तर त्यांच्यासाठी आपण का पैसे देऊ शकत नाही. आपण इतर सहकारी संस्थांना पैसे देतो तर ही एक संस्था आहे. मग अशावेळेला मुंबई बँकेचे धोरण आणले. त्यावेळी काहींनी मला वेड्यात काढले. पण आपली नियत, उद्देश चांगला असेल तर आपण यशस्वी होतो. आम्ही धोरणेल आणले. मुंबईतील काही संस्थांना कर्जे दिली. एक-दोन इमारती उभ्या राहिल्या. त्यानंतर गृहनिर्माण संस्थांचा ओघ वाढत गेला. १६०० प्रकल्प आले. हजार-दोन हजार कोटींची मदत बँकेच्या माध्यमातून उभी करू शकतो. मग राज्य सहकारी बॅंकेला बरोबर घेण्याचे ठरवले. राज्य सहकारी बँकेने आमचं व्यवस्थित चालू असताना, आम्ही कर्ज देत होतो कुठेही अडचण नव्हती. त्यांनी परवानगीसाठी आरबीआयला पत्र पाठवले. आरबीआयने रिअल इस्टेटला मदत कशी करता असे म्हटले. जेव्हा आपली भावना साफ आणि स्वच्छ असते तेव्हा यशस्वी होतो. या सर्व गोष्टींना देवेंद्र फडणवीस यांनी राजश्रय दिल्याचे दरेकर म्हणाले.

दरेकर पुढे म्हणाले की, हे अभियान ज्यावेळी मी यशवंतराव प्रतिष्ठानला सुरु केले. हा लोकांच्या हिताचा कसा विषय आहे हे पटवून दिल्यानंतर फडणवीस यांनी जीआर काढला होता. मात्र सरकार बदलले, अडीच वर्ष जीआर तसाच राहिला. त्यानंतर फडणवीस आणि मी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची भेट घेत हा विषय त्यांना समजावून सांगितला. आम्ही रिअल इस्टेट आणि बिल्डरला पैसे देत नाही. आम्ही पैसे जी सहकारी संस्था आमची सभासद आहे त्या सभासद संस्थेला पैसे देतो कुठलाही फायदा मिळवण्याचा उद्देश नसतो. जवळपास पाऊणतास शक्तिकांत दास यांनी तो विषय समजून घेतला. आज आरबीआयने देशपातळीवर स्वयंपुनर्विकासाला बँकांनी कर्ज द्यावे असे धोरण बनविले असल्याचे दरेकरांनी सांगितले.

दरेकर पुढे म्हणाले की, स्वयंपुनर्विकास एक चळवळ म्हणून उभी राहिली आहे. यात राज्य सरकारलाही सहभागी केले आहे. सुदैवाने आपले सरकार आलेय. त्या सरकारमध्ये मी बोलू शकतो देवेंद्र फडणवीस यांना हा विषय माहित होता. त्यांना यातील अडचणी पुन्हा सांगितल्या. यासाठी नेस्को मैदानावर अभूतपूर्व परिषद घेतली. जसा पावसाचा वर्षाव होतो तसा घोषणांचा वर्षाव केला. नुसता वर्षाव केला नाही तर जीआर बनण्याची प्रक्रिया सुरु झाली. हे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे. सरकार शेतकऱ्यांना सवलती देते. कारण तो बळीराजा आहे. मग सर्वसामान्य माणूस रात्रं दिवस काबाडकष्ट करून या इमारतीत राहतो त्यालाही सवलती पाहिजेत. म्हणून आज सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. मागणी वाढतेय यासाठी सरकारला बोललो सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन करा. सेल्फ डेव्हलपमेंट महामंडळ स्थापन करतोय अशी घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली आहे. लवकरच ते कार्यान्वित करून घेऊ, असेही दरेकर यांनी म्हटले. तसेच उपनगरातील स्वयंपुनर्विकासासाठी समन्वयक म्हणून कवठणकर यांची मुंबई बँकेतर्फे नेमणूक करू. ही नेमणूक शासकीय असेल. कारण मुंबई बँकेला नोडल एजन्सी म्हणून शासनाने अधिकृत केले आहे, असेही दरेकर म्हणाले.

यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, माजी नगरसेविका संध्या दोशी यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता पाटील यांनी केले.

चौकट

सोमवारी मंत्रालयात बैठक

दरेकर म्हणाले की, सोमवारी दुपारी मंत्रालयात बैठक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चीफ सेक्रेटरीला म्हटले आहे की मी सहकारी गृहनिर्माण परिषदेत ज्या ज्या घोषणा केल्या त्याचे जीआर काढा. त्यामुळे ज्याज्या घोषणा झाल्यात ते सर्व विषय मार्गी लावण्यासाठी सोमवारी मंत्रालयात ही बैठक होत आहे.

error: Content is protected !!