कोरोनाग्रस्तांना वाली कोण?
’भीक नको पण कुत्रा आवर’च्या धर्तीवर ’उपचार नको पण हॉस्पिटलांना आवरा’ म्हणायची वेळ आता कोरोनाग्रस्तांवर आली आहे. हो! कोरोनाग्रस्तच. दुष्काळग्रस्त, प्रकल्पग्रस्त असतात तसे हे कोरोनाग्रस्त. कोरोनाच्या नावाखाली यांची अक्षरश: पिळवणूक चाललीय. यातील काही कोरोनाचे रुग्ण असतील. काही नाहीत. संसर्ग असला तरी अनेकांना लक्षणेही नाहीत. आजाराचा त्रास नाही. पण उपचार मात्र जीवघेणे. खर्च संपूर्ण कुटुंबाला भिकेला लावणारा.
’कोरोना म्हणजे साधा फ्ल्यू कि महामारी?’ याचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा होईल. पण सध्या तरी या कोरोनाने जनसामान्यांचे जगणे अवघड करून टाकलंय. एकीकडे कोरोनाच्या भीतीने घराबाहेर पडता येत नाही. सगळे व्यवहार ठप्प. त्यामुळे अनेकांची आर्थिक स्थिती अडचणीची झाली आहे. त्यातच कोरोनाच्या नावाखाली खासगी हॉस्पिटल अक्षरश लुटताहेत. *परवडत नाही तर सरकारी दवाखान्यात जा म्हणणे सोपे आहे. पण प्रत्यक्षात असे दवाखाने किती? त्यांची क्षमता किती? याचा विचार होत नाही. तिथली दुरावस्था हा अजून एक वेगळा विषय. त्यामुळे खासगी हॉस्पिटल नामक खाटकाच्या सुर्याखाली मान देण्याशिवाय या कोरोनाग्रस्तांना पर्याय नाही.* शिवाय अन्याय झाला म्हणून तक्रार करायचीही सोय नाही.
राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे तत्कालीन मुख्य जनसंपर्क अधिकारी जयंत करंजवकर असेच कोरोना आणि व्यवस्थेचे बळी ठरले. अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून डॉ. प्रसिता क्षीरसागर यांच्या सल्ल्यानुसार, ’वेल्लम हॉस्पिटल, गांधीनगर, ठाणे’ येथे दाखल झाले. पण आरटी-पीसीआर टेस्ट (कन्फर्मेटरी टेस्ट) झालीच नाही. *लाखो रुपयांचे बिल झाले पण ’काय औषधोपचार केले?’ याचे डिटेल्स नाहीत. स्वच्छता – जेवणखाण सगळ्याच बाबतीत हेळसांड.* शेवटी 6 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने ते गेले. या प्रकरणी त्यांच्या मुलाने स्थानिक पोलीस स्थानकात (चितळसर, ठाणे) रीतसर तक्रार नोंदवली. समाज आणि प्रसार माध्यमांतून आवाज उठवला म्हणून हॉस्पिटल प्रशासनाकडून त्यांना धमक्याही येतात. कुटुंब तणावात आहे. पण *पोलिसांनी अजूनही साधा एफआयआर दाखल केलेला नाही.*
रामचंद्र दरेकर हे असेच एक रुग्ण. त्यांना कुर्ल्याच्या कोहिनूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. महिनाभर उपचार करून रुग्ण दगावला. बिल झाले 17 लाख 10 हजार रुपये. राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे हे चुलते. त्यामुळे दरेकर यांनी हॉस्पिटलला भेट दिली तेव्हा ही रक्कम 13 लाखांवर आणण्यात आली. खरंतर कोरोना पेशंटला एवढं बिल लावता येत नाही, शासनाने कमाल दरमर्यादा निश्चित करून दिली आहे. यातून पळवाट म्हणून हॉस्पिटलने फार्मसीचे बिल वाढवले. *बाजारात 300-400 रुपयांत मिळणार्या पीपीई किटसाठी 2700 आकारण्यात आलेत. रुग्णाला तब्बल 400 इंजेक्शन दिल्याचे बिलात नमूद केले आहे. विशेष म्हणजे आजही कोरोनावर कोणतेही ठोस औषध उपलब्ध नाही. मल्टी व्हिटॅमिन्सच्या गोळ्या, गरजेनुसार कॉमन फ्ल्यूची औषधे एवढ्यावरच भिस्त. असे असताना 82 वर्षे वयाच्या पेशंटला 400 इंजेक्शन्स कशी काय दिली जाऊ शकतात?* त्यांच्या शरीराची तेवढी औषध स्वीकारण्याची ताकद तरी असते का? या प्रश्नांची उत्तरे कुणी देत नाही आणि मागितली जात नाही.
*आजमितीला भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32 लाखांहून अधिक आहे.* जीव गमावलेल्याची संख्याही वाढणारी आहे. अशावेळी प्रबोधन करण्याची गरज असताना सगळे एकाएकी गप्प झालेत. अँटीजेन टेस्ट, अँटीबॉडी टेस्ट, आरटी-पीसीआर टेस्ट म्हणजे नेमके काय? कुठली टेस्ट पॉझिटिव्ह यायला हवी? कुठली निगेटिव्ह? उपचार काय असतात? सगळ्यांनीच दवाखान्यात दाखल होणे गरजेचे आहे का? घरीच कोरंटाईन होऊन उपचार घेणे शक्य आहे का? सध्या चर्चेत असलेल्या रेमडेसिवीर, टॉसिलीझूमॅब, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन सारख्या औषधांचे भयानक साईड इफेक्टस. पीपीई किटचा दर्जा, किमती, याबद्दलची चर्चा व्हायला हवी. पण कुणालाच त्यात रस दिसत नाही.
आज सगळीकडे भयाचे वातावरण आहे, कारण कोणालाच या रोगाबद्दल नेमकी माहिती नाही.* नुसतीच सेलेब्रेटींची खबरबात, म्हणजे बातमीदारी नाही. शासनाचे काय अध्यादेश आहेत? कोविड पेशंटसाठी दरमर्यादा किती? कुठल्या रुग्णालयात किती खाटा आहेत. विलगीकरण कक्ष कुठे आहेत? तिथल्या सेवा काय? परिस्थिती काय? रुग्णसेवेत हलगर्जी झाली तर कुठे तक्रार दाखल करायची? याची माहिती प्रसारित करणं जास्त गरजेचे आहे. सामान्यांना याची माहिती नाही, याचा फायदा हॉस्पिटल माफिया घेतात. आणि अशा करंट्यामुळे लोकांच्या मनात वैद्यकीय व्यवसायाविषयी अढी निर्माण होते. त्यातून मग पुन्हा डॉक्टरांवर हल्ले वगैरे प्रकार होतात. हे दुष्टचक्र थांबवायचे असेल तर योग्य वेळी योग्य माहिती पोहचविणे गरजेचे आहे.
एकीकडे मृत्यूची टांगती तलवार दुसरीकडे रोजच्या जगण्याची भ्रांत, यातून अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडते आहे. मोकळी हवा नाही, सूर्यप्रकाश नाही. घर बैठी जीवनशैली यामुळे शरीरस्वास्थ्य बिघडतंय. ज्यांचे रोजगार गेलेत, उत्पन्न थांबलंय त्यांच्या समस्या निराळ्याच. यासगळ्या कोरोनाग्रस्तांना आज प्रशासनाच्या, व्यवस्थेच्या, माध्यमांच्या आधाराची गरज आहे. पण आपसातले हितसंबंध जपत सगळेच चिडीचूप. ही परिस्थिती तातडीने बदलायला हवी. अन्यथा भविष्यातील स्थिती याहून भयानक असेल.
*- उन्मेष गुजराथी*