आयुष्याच्या संध्याकाळी ’सन्मान योजना’ सन्मानाने द्या !
महाराष्ट्रातील पत्रकारांना निवृत्तीवेतन देण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. प्रकाश बाळ जोशी, बाळ देशपांडे अशा दिग्गज पत्रकारांनी मागणी केल्यानंतर ती सर्वच पत्रकारांनी उचलून धरली आणि सरकार दरबारी अर्ज विनंत्या करीत पाठपुरावा केला. भारतातील अनेक राज्यांनी पत्रकारांना निवृत्तीवेतन देण्यास सुरुवातही केली. परंतु लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांची परंपरा सांगणार्या आणि त्यानंतर खाडिलकर, दिनू रणदिवे, मधू शेट्ये यांनी ही वैभवशाली परंपरा पुढे नेलेल्या महाराष्ट्रातील पत्रकारांना संघर्षाशिवाय काही द्यायचेच नाही, असा चंगच जणू यशवंतराव चव्हाण यांच्या पासून राज्यकर्ते झालेल्या सर्वांनी बांधलाय की काय असंच आता वाटू लागलंय. अरे, जर वर्तमानपत्रांच्या मालकांनीच जर त्यांच्या त्यांच्या पत्रकारांना पेन्शन दिले असते तर ही मागणीच पत्रकारांना सरकार दरबारी करावी लागली नसती. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे सरकार 5 डिसेंबर 2014 पासून अधिकारारुढ झाले. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे 31 ऑक्टोबर 2014 रोजी मुख्यमंत्री झाले परंतु शरद पवारांच्या अद्रुष्य हातापासून बचावण्यासाठी देवेंद्रांनी मातोश्री निवासी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हात हातात घेतला आणि आपली पाच वर्षाची वाटचाल निर्धोक पणे 2019 पर्यंत चालविली. याच काळात त्यांनी पत्रकारांना पेन्शन देण्यासाठी कंबर कसली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या खात्यात नस्ती(फाईल) पाठवली. पण नसती उठाठेव केली नाही तर ते अर्थ खाते कसले ? आपण सरकारच्या कर्मचार्यांना 2005 पासून पेन्शन देणे बंद केले आहे, मग पत्रकारांना पेन्शन कसे आणि का बरे द्यायचे ? असा सवाल झारीतल्या शुक्राचार्यांनी उपस्थित केला. पण मला ’बाय हूक ऑर क्रूक’ पत्रकारांना पेन्शन द्यायचेच आहे, नांव काहीही द्या पण मला पत्रकारांना मदत करायची आहे. मेहेरबानी म्हणून नाही तर त्यांचा तो अधिकार आहे, असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आणि ’आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थ खात्याचे प्रधान सचिव यु. पी. एस. मदान यांनी पुरवणी मागण्यांत तशी तरतूद केली ज्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 4 जुलै 2018 रोजी विधानमंडळाच्या दोन्ही सदनांत सादर केल्या. राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदुनाथ जोशी यांनी यासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. 1 ऑगस्ट 2019 पासून ही आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरुही करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे नेहमी म्हणत असत की, पुढारी आणि नेत्यांनी नाही म्हणायला शिकले पाहिजे तर सरकारी अधिकारी/यंत्रणेने हो म्हणायला शिकले पाहिजे. परंतु नेमके उलटच घडते. काही अधिकार्यांना असंच वाटतं की सरकार नाही तर आम्ही आमच्याच खिशातून पैसे देत आहोत, अशा पद्धतीने काही अधिकारी वागतात आणि आमच्यातलेच काही नतद्रष्ट त्यांना खतपाणी घालून साथ देत असतात. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या बाबतीत सुद्धा दुर्दैवाने हेच घडू पहात आहे. काहींच्या चेहर्यावर तर निव्वळ बारा वाजलेले असतात.
थोर समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या सान्निध्यात राहून सांज मार्मिक हे दैनिक प्रसिद्ध होण्यासाठी संपादक बाळासाहेब ठाकरे यांना सहकार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत आणि विजय वैद्य हे रात्री उशिरापर्यंत मार्मिक कार्यालयात सांज मार्मिक चे काम करायचे आणि रात्री वर्तमानपत्रांच्या गठ्ठ्यांवरच/ टेबलावर झोपायचे. विजय वैद्य यांना सन्मान योजना लागूही झाली. पण ज्या पंढरीनाथ सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना, ’मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मार्मिक ची सेवा करीन,’ हा शब्द दिला होता. 7 जानेवारी 1935 रोजी जन्माला आलेल्या या गिरणगावच्या पंढरीनाथांना ज्या सरकारने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जीवनगौरव पुरस्कार दिला त्याच सरकारने सन्मान योजनेसाठी त्यांच्या लेखांची कात्रणे मागावीत ? आज वयाच्या 85 व्या वर्षी पंढरीनाथ सावंत यांनी कात्रणे कुठून शोधून सरकार दरबारी सादर करायची ? वयाच्या 87 व्या वर्षी यशवंत उर्फ आबा मुळ्ये, वयाची 95 वर्षे ओलांडलेल्या कल्याणच्या दामूभाई ठक्कर, 75 व्या वर्षाच्या उंबरठ्यावर असलेल्या, आचार्य अत्रे यांच्या ’मराठा’ मध्ये काम करणार्या अनंत मोरे आणि प्रभाकर राणे यांनी कात्रणे कोठून आणायची ? मातोश्रीत एकेकाळी वावरणार्या आणि बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या परीसस्पर्शाने पुनीत झालेल्या विलास मुकादम यांनी कात्रणे कोठून गोळा करायची ? अंहों पुंण्यांच्यां रांमंभांऊं जोंशींनीं तंरं 98व्यां वंर्षींहीं संगंळीं कांत्रंणं जंपूंनं ठेंवंलींतं हों, असे उत्तर देणारे त्यांच्याच कार्यालयात मी सामना चा प्रतिनिधी म्हणून अधिस्वीकृती पत्रिकेसाठी केलेल्या अर्जावर दस्तुरखुद्द संपादक बाळासाहेब ठाकरे यांनी ’बाळ ठाकरे’ अशी एक नव्हे तीन वेळा (एक अर्ज आणि दोन नूतनीकरण अर्ज) सही केलेला कागद सरकारी अधिकारी शोधून देऊ शकतील काय ? असो, मला वाद घालायचा नाही पण मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने ज्येष्ठ पत्रकारांसमवेत आयोजित केलेल्या 20 फेब्रुवारी 2019 रोजीच्या सभेत स्पष्ट भूमिका मांडली होती. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी माझ्या भूमिकेला मान्यता दिली होती. काही नतद्रष्टांनी कोलदांडा घातला आणि आज असंख्य ज्येष्ठ पत्रकार या सन्मान योजनेपासून वंचित राहिले आहेत. मी 27 नोव्हेंबर 2020 रोजी माहिती व जनसंपर्क विभाग ज्यांच्याकडे आहे अशा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ’वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी दुपारी साडेबारा ते एक या दरम्यान मुलाखती निमित्त भेट घेतली. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि आहुति साप्ताहिक व त्रिवेदी कुटुंबातर्फे 25 हजार रुपयांचा धनादेश ’मुख्यमंत्री सहाय्यता निधीला’ म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती सुपूर्द केला. कोरोनामुक्तीच्या युद्धात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ सर्वोत्कृष्ट कार्य करीत असल्याने सामाजिक बांधिलकीची जाण म्हणून खारीचा वाटा उचलल्याचे समाधान स्वीकारले. याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक निवेदन सादर करुन आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी काही मुद्दे सुचविले. हे निवेदन या प्रमाणे : माननीय नामदार श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. मुंबई. सस्नेह जय महाराष्ट्र ! आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी काही महत्त्वाच्या सूचना वजा विनंती मी आपणांस करीत आहे, कृपया त्याचा आपण सहानुभूतीने विचार करावा. ; आयुष्याच्या संध्याकाळी ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणारी सन्मान योजना सन्मानाने मिळावी ;राज्य अधिस्वीकृती समितीने जे ठराव मंजूर केले आहेत, त्यांचे शासन निर्णय (जी आर) विनाविलंब काढण्यात यावेत.; 60 वर्षे वय आणि 30 वर्षे अनुभव या ऐवजी 58 वर्षे वय आणि 25 वर्षे अनुभव ही पात्रतेतील महत्त्वाची बाब असून त्याचाही शासन निर्णय (जी आर) तातडीने काढण्यात यावा .;कर्मचारी 58 व्या वर्षीच सेवानिवृत्त होतो आणि मग त्याला निवृत्तीवेतन देण्यात येते, हाच मुद्दा आहे.;30/35/40 वर्षांपूर्वीची कात्रणे सापडू शकत नाहीत. अनेकांची कागदपत्रे नैसर्गिक आपत्तीत नष्ट झाली आहेत. वाहून गेली आहेत. त्यामुळे अधिस्वीकृती पत्रिका, स्वयंघोषणा पत्र (शपथपत्र), आधार कार्ड यावर पत्रकारांना या योजनेचा लाभ देण्यात यावा.; मुंबईतील पत्रकारांसाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या कडून ज्येष्ठ पत्रकारांना (ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत परंतु अधिस्वीकृती पत्रिका आहे अशांसाठी) शिफारशी घेण्यात याव्यात. जिल्हा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी जिल्हा पत्रकार संघांकडून शिफारशी घ्याव्यात.;या बरोबरच राज्य अधिस्वीकृती समितीची आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीची तातडीने पुनर्रचना करण्यात यावी. आज राज्यात अनेक ज्येष्ठ पत्रकार आपल्या मार्गदर्शन आणि निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. आपण अशा सर्वच ज्येष्ठ पत्रकारांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी दिलासा द्यावा, ही नम्र विनंती. कात्रणे सादर करण्यासाठी सगळेच पत्रकार काही दिनू रणदिवे आणि विजय वैद्य यांच्या सारखे कात्रणे आणि वर्तमानपत्रांच्या गठ्ठ्यांत रहात नाहीत अथवा राहू शकत नाहीत, हे पंढरीनाथ सावंत या मातोश्रीवर सतत वावरलेल्या ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्येष्ठ पत्रकाराच्या मताशी आपण सहमत व्हाल, अशी खात्री आहे. केवळ कात्रणे नाहीत म्हणून आमची पन्नास वर्षांची पत्रकारिता निरर्थक, फुकट गेली कां ? मुख्यमंत्री महोदय, आपण स्वतः ’मार्मिक’, दैनिक ’सामना’ आणि ’दोपहर का सामना’चे मुख्य संपादक बाळासाहेब ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हणून कार्यरत होतात, यासाठी आपणच ज्येष्ठ पत्रकारांना आयुष्याच्या संध्याकाळी ’आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ सन्मानाने मिळवून द्याल, हा विश्वास आहे. आई तुळजाभवानी, आई एकवीरा देवी आपल्याला उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य देवो, हीच प्रार्थना
-योगेश वसंत त्रिवेदी,