महाराष्ट्र दौऱ्यात उपोषणकर्त्यांकडे फिरवली पाठ -मराठा समाज मोदी आणि भाजपवर प्रचंड नाराज
जालना – महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले मोदी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणकर्त्या जरंगे पाटलांची भेट घेतील असे वाटले होते. पण तसे झाले नाही त्यामुळे मराठा समाज मोदी आणि भाजपवर प्रचंड नाराज झाला असल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान मोदींना आता गरिबांची गरज नाही हे कळलं आहे. आता आमची आरक्षणाची लढाई आम्हीच लढू असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटले. शिर्डी दौऱ्यावर आलेले पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणाचा कोणताही उल्लेख न केल्याने मराठा आरक्षण आंदोलकांमध्ये नाराजी पसरली आहे. उपोषणावर असलेल्या जरांगे यांनीदेखील पंतप्रधानांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
मनोज जरांगे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान मोदी हे सरकारला सांगू शकत नसतील तर तेथून दिल्लीतून काय सांगणार, असा सवाल त्यांनी केला. आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीबांचे प्रश्न सोडवतील असा गैरसमज होता. पण मोदी बोलले नाही म्हणून बर झालं. त्यामुळे ते गरीबांचे ऐकणारे पंतप्रधान आहेत हा गैरसमज दूर झाला असल्याचेही मनोज जरांगे यांनीी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोरगरिबांच्या मुलांसाठी विनंती केली होती. मात्र याविषयी नरेंद्र मोदी यांनी आरक्षणावर भाष्य केले नाही. मराठा समाजाने ठरवले असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येऊ दीले नसते. पंतप्रधान मोदी बोलले नाही हे बरे झाले. यावरून समजते की त्यांना आता गोरगरीबांची गरज नाही. त्यामुळे आम्ही आता ही लढाई आम्हीच लढणार असल्याचा एल्गार जरांगे यांनी केला.
मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे आता त्यांच्या परिवाराची चिंता वाढलीये. ‘आरक्षणाचा मुद्दा तात्काळ निकाली काढावा अन्यथा आपल्या पतीचे काही बरे वाईट झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील’ असा इशारा मनोज जरांगे यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी दिला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्याने काहीतरी मार्ग निघेल अशी आशा मनोज जरांगे यांचे वडील रावसाहेब जरांगे यांनी व्यक्त केली. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आमरण उपोषणाची हाक दिली. त्यानंतर एकतर आता माझी अंत्ययात्रा निघेल नाहीतर मराठ्यांची विजय यात्रा निघेल असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला