येवल्या मध्ये शरद पवार गटाचा मराठा उमेदवार
मुंबई -विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच घटक पक्षांकडून अनेक मतदारसंघात आता आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. येवला मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. येवला हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पहिल्याच यादीमध्ये या मतदारसंघातून भुजबळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर छगन भुजबळ यांच्याविरोधात महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर येवल्यामधून महाविकास आघाडीनं आपला उमेदवार जाहीर केला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपल्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये येवला मतदारसंघाचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून येवल्यामधून मणिकराव शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता या मतदारसंघामध्ये शिंदे आणि भुजबळ यांच्यामध्ये काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.