ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
विश्लेषण

संतांनी मानवी मूल्यांचा जागर केला तोच संविधानाचा गाभा झाला

  • ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर
    मंगळूरपीर (प्रतिनिधी) : जाती-धर्माच्या आणि वर्णाच्या आधारे रुजविलेली वीषमता दूर करून मानवी मूल्यांचा जागर संतांनी केला. तीच मूल्य पुढे संविधानाचा गाभा झाली, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार, ज्येष्ठ पत्रकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधूत्व ही मूल्य आपल्याला संत साहित्यात दिसतात, असेही ते म्हणाले.

संविधान दिनानिमित्त पाथ फाऊंडेशनच्या वतीने मंगळूरपीर येथील विठ्ठल मंदिरात शामसुंदर महाराज यांचे संविधान कीर्तन आयोजित केले होते. त्यावेळी शामसुंदर महाराज बोलत होते.
विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म
भेदा भेद भ्रम अमंगळ
या अभंगांचे निरुपण करताना
ते म्हणाले की, सातशे वर्षांपासून वारकरी संप्रदायाच्या इमारतीमध्ये सगळ्या जाती, धर्माचे, पंथाचे, प्रांतांचे लोक गुण्यागोविंदाने राहात आहेत. सर्व समाज घटकातील संत वारकरी परंपरेत होऊन गेल्याचे सांगत सोन्नर महाराज पुढे म्हणाले की
“यारे यारे लहान थोर। याती भलते नारी नर। करावा विचार। न लगे चिंता कोणाशी।।”
यासारख्या अभंगातून समतेचे मूल्य अधिक ठळकपणे वारकरी संत परंपरेने रुजवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा समाजात जात – धर्माच्या नावाने वीष पसरविले जात होते, समाजात उघड फूट पाडली जात होती. परमार्थाच्या नावाखाली विषमता पसरवली जात असे. अशा वेळेस वारकरी संप्रदायाने समतेची मुल्ये रुजवण्याची सुरुवात केली. वारकरी परंपरेत सर्व जाती धर्माचे लोक एकमेकांच्या पाया पडतात. तेथे सर्वांना समान दृष्टीने पाहिलं जाते. वारकरी संप्रदायात गावकुसाबाहेर राहत असलेली सोयराबाई, धुणीभांडी करणारी जनाबाई, वेश्येची मुलगी कान्होपात्रा या महिला संत होतात, यातून वारकरी संतांची स्त्रियांना सन्मान देण्याची भूमिका दिसून येते.
कोणाही जीवाचा न घडो मत्सर | वर्म सर्वेश्वर पूजनाचे ||
या संत तुकारामांच्या अभंगात आपल्याला बंधुत्वाचे विचार दिसतात. ते आज आपल्या संविधानातील प्रमुख मूल्य आहेत.
“जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा ।। ” या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी खऱ्या संतांची ओळख करून दिलेली आहे. धार्मिक कट्टरता पसरवणाऱ्या आज बऱ्याच शक्ती समाजात निर्माण झाल्या आहेत. वारकरी संप्रदायात अनेक मुस्लिम संत होऊन गेले. ते खरे वारकरी संस्कृतीचे प्रतिक आहे. ‘ कबीर, मोमिन, लतिफा ‘ अशा अनेक मुस्लिम संतांचे वारकरी संप्रदायातील स्थान त्यांनी अधोरेखित केले आहे.आजही महाराष्ट्रात २२ मुस्लिम कीर्तनकार आहेत जे संविधानाची मूल्य रुजवण्याचे काम करत आहेत. वारकरी संप्रदायाने शैव-वैष्णवातील कट्टरता संपवत माणूस म्हणून जगण्याचा संदेश दिला तसेच आज विविध जाती-धर्मातील विषमता संपवण्याचे काम वारकरी संप्रदायातील कीर्तनकार करीत आहेत. ख्रिश्चन असणारे ग्रॅण्ट अलेक्झांडर या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी संत तुकारामांचे अभंग हे सरकारी खर्चातून २४ हजार रुपये खर्च करून दीडशे वर्षापूर्वी प्रसिद्ध केले. अशा प्रकारे सर्वधर्मसमभावाची परंपरा वारकरी परंपरेने जपली आहे, असेही शामसुंदर महाराज म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष ऍड. वैष्णव इंगोले यांनी केले. तर आभार शुभम पवार यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी पाथ फाऊंडेशन चे सुमेध पजई,चंद्रशेखर ढोले,अतुल खोपडे, हरिओम महाकाळ, आकाश राठोड, आकाश चौधरी, यज्ञेष इंगोले, ऋषिकेश इंगोले यांनी विशेष परिश्रम घेतले.
वाशिम जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य अरविंद पाटील इंगोले, रमेश पाटील शिंदे, बळीराम राठोड, अड. प्रकाश इंगोले, अड. बी. एम. ठाकरे, अड. मनिष गिरडेकर, निलेश तुळजापूरे , एम. सी. राऊत, सुरेश गावंडे, श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे सर्व विश्वस्त, चारभुजनाथ नित्य योग मंडळाचे अध्यक्ष श्यामसुंदर भुतडा जी व सर्व सदस्यगन व मंगरूळपीर नगरातील आदी मान्यवर हे यावेळी उपस्थित होते. नगरातील नागरिकांनाही ह्या आधुनिक कीर्तनाला उत्स्फूर्तपने प्रतिसाद दिला.
………………………

error: Content is protected !!