लाडक्या बहिणींनी महायुतीला तारले
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी वीस मे रोजी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचा आज निकाल लागला. या निवडणुकीत मध्य प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्राची लाडकी बहिणी योजना निर्णायक ठरली. आणि लाडक्या बहिणीने भरभरून भ्रष्टाचारी आणि जातीयवादी भावांच्या पारड्यात मतं टाकली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बॅक फुटवर गेलेले भाजपवाले फ्रंट पोस्टवर आले. या निकालाने एक गोष्ट मात्र निश्चित झाली आहे की, मतदाराला स्वतःचे विचार , स्वतःची भूमिका आणि स्वतःचे अस्तित्व राहिलेले नाही. मतदाराला कोणीही पैशाने विकत घेऊ शकतो, किंवा पैशाची लालच देऊन त्याची मते घेऊ शकतो हेच या निवडणुकीने सिद्ध झालेले आहे.त्याच बरोबर मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील या निवडणुकीच्या राजकारणात कवडीचीही किंमत नाही हे सिद्ध झाले.याला पाडा,त्याला पाडा अशा वल्गना करणाऱ्या जरांगेंचा पोपट झाला. महाराष्ट्र समोर आज अनेक गंभीर प्रश्न आहेत.पण त्या प्रश्नांवर ही निवडणूक लढवली गेली नाही तर जातीयवाद, बटेंगे तो कटेंगे, हिंदू धर्म संकटात आहे, अशा प्रकारच्या मुद्द्यांवर या निवडणुकीत मतदान झालेले आहे .त्याचबरोबर महायुतीच्या नेत्यांना पक्क माहित होतं की लाडकी बहीण योजना आपल्यासाठी फायदेशीर ठरणार .त्यामुळे लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून अवघ्या दीड हजार रुपयांमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील माय माऊली यांची मते मिळवली आणि आपली सत्ता टिकवली. परंतु ज्या आमच्या माता भगिनींनी या लोकांना पुन्हा सत्तेत नेऊन बसवले, त्या माता भगिनींना आता पुढील पाच वर्षात कशाप्रकारे महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. महागाईच्या आगीत कशाप्रकारे होरपळून जावे लागणार आहे याची कल्पना नाही .तुम्हाला दीड हजार दिले पण तुमच्याकडून आता महागाईच्या माध्यमातून दीड लाख रुपये वसूल केले जातील. महागाईचा वणवा भडकेल. जीवनावश्यक वस्तू सुद्धा आवाक्याच्या बाहेर जातील .किचनचा बजेट पूर्णपणे बिघडून जाईल. याचा लाडक्या बहिणीने विचार केला आहे का? ज्या लोकांनी लाडक्या बहिणीची दीड हजारात मत विकत घेतली, त्या लोकांनी महाराष्ट्राच्या तिजोरीवर केवढा मोठा कर्जाचा डोंगर उभा करून ठेवलाय याची लाडक्या बहिणींना कल्पना यायला हवी होती. पण असो शेवटी लोकशाही खूप स्वस्त झाली आहे .जर दीड हजारात सत्ता विकत घेता येऊ शकते. तर यापुढे दीड लाखात किंवा दीड कोटीत हे राज्य आणि देश सुद्धा विकला जाऊ शकतो. म्हणजे लोकांना काय पडलेच नाही. बस आपल्याला पैसे मिळाले ना संपले .आपल्या शहराचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा कोणीही विचार करायला तयार नाही. त्यामुळे यापुढे मोदी म्हणतात त्याप्रमाणे वन नेशन वन इलेक्शन, किंवा वन नेशन वन पार्टी अँड वन लीडर हेच होणार आहे .आणि व्हायला हवे! कारण लोकांना स्वतःच्या, आपल्या कुटुंबाच्या, आपल्या येणाऱ्या पिढीच्या, भवितव्याबद्दल चिंताच राहिली नाही. एक दोन हजारात आपली मतं विकायची आणि स्वस्त बसायचे हीच जर लोकांची मानसिकता असेल, तर ७७ वर्षांपूर्वीचे गुलामीत राहणारे लोक, आणि आज राजकीय पक्षांच्या गुलामीत राहणारे लोक यांच्यात काहीही फरक राहिलेला नाही. फरक फक्त एवढाच आहे, तेव्हा गोरे इंग्रजी होते आता काळे इंग्रज आले. पण लोकांची गुलामीची मानसिकता तीच आहे. आमच्या माय माऊलींना फक्त एवढेच विचारायचे आहे, हे दीड हजार तुम्हाला महिन्याला पुरतात का? आता दीड हजाराची २१०० केले आहेत. उद्या तीन हजार ही करतील. पण तेवढ्याने तुमचं संसार चालणार आहे का ?याचा कधीतरी तुम्ही विचार करायला हवा होता. आज महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचे कर्ज आहे .आणि त्यात लाडकी बहीण योजनेमुळे आणखी कर्ज वाढणार आहे. बरे हे कर्ज भाजपवाले, अजित पवार वाले, किंवा शिंदे वाले, आपल्या खिशातून खेळणार नाहीत. तर तुमच्या आमच्या खिशातून हे कर्ज फेडावे लागणार आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात महागाई किती वाढेल याचा अंदाज ही व्यक्त करू शकत नाही. पण आता काय करणार दीड हजारात आपण विकले गेलो .त्यामुळे पुढील पाच वर्षात हे सगळं भोगावे लागणार आहे. चला बघूया शेवटी गुलामितून पुन्हा गुलामीच! ब्रिटिशांच्या काळात गुलामी होती. आणि आता स्वातंत्र्याच्या काळात ही भ्रष्ट जातीयवादी पुढार्यांची गुलामी करावी लागणार आहे. वास्तविक इथल्या विरोधी पक्षावर ही लोकांचा विश्वास नाही. कारण महायुतीच्या विरोधात ज्या पद्धतीने, ज्या एकजुटीने महाविकास आघाडीची ताकद निर्माण व्हायला हवी होती, ती होऊ शकली नाही .जागा वाटपावरून महाविकास आघाडीचे नेते फक्त एकमेकांचां खून करायचे बाकी राहिले होते. एवढा वाद, एवढा विरोध, जर असेल तर लोकांनी तुमच्यावर का विश्वास ठेवावा. महाराष्ट्रातला विरोधी पक्ष ही नालायक निघाला .म्हणून तर महायुतीला पुन्हा सत्ता राखता आली. जर विरोधी पक्ष मजबूत असता, विरोधी पक्षातील लोकांचा एकमेकांवर विश्वास असता तर आज महायुतीला पुन्हा सत्ता मिळाली नसती. अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला पृथ्वीराज चव्हाण,बाळासाहेब थोरात यांच्या सारखे दिग्गज नेते पराभूत झाले. त्यांच्यावर ही पाळी का आली याचा त्याने आता तरी गांभीर्याने विचार करायला हवा. महाविकास आघाडी मनापासून एकत्र राहिली नाही. आणि एकत्र लढले ही नाहीत. त्याचा परिणाम त्याना भोगावे लागला.आता पाच वर्षे वाट बघत बसा .तोपर्यंत महायुतीचे सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात आणखी चार पैसे टाकतील. त्याला आणखी काही लालूच दाखवतील. आणि पुढच्या पाच वर्षाची निवडणूक सुद्धा जिंकतील .अशा पद्धतीने लोकांना आमिष दाखवून जर निवडणुका लढवल्या जाणार असतील तर लोकशाही पद्धतीच्या या निवडणुका बंद करा. आणि सरळ एकाच कुठल्यातरी पक्षाच्या हातात ते सगळे देऊन टाका. म्हणजे निवडणुकीवर होणारा अफाट खर्चही होणार नाही
आणि नेत्यांवर दारोदार मत मागायला फिरण्याची वेळ ही येणार नाही .कारण आता लोकशाही संपल्यात जमा आहे .आणि लोकशाही जर अशी विकत घेण्याइतपत स्वस्त झालेले असेल तर लोकशाही सुद्धा नको. आणि लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुका सुद्धा नको. लोक आता वैतागले आहेत. या सगळ्या गोष्टींची लोकांना चीड आहे. तेव्हा निवडणुकीचे हे नाटक आता बंद व्हायला हव. या निवडणुकीने एक गोष्ट मात्र चांगली केली ती म्हणजे घोडेबाजार बंद झाला. कारण महायुतीला पासवी बहुमत मिळालेले असल्याने, आता अपक्षांना मस्का लावण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अपक्ष अक्षरशः वाऱ्यावर पडले आहेत.त्यांना आता कुत्राही विचारणार नाही.त्याच बरोबर भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेचाही बाजार उठलाय .माहीम मधील राजपुत्राचा पराभव झाल्याने राज ठाकरेंनी यातून धडा घेण्याची आवश्यकता आहे. अपक्षणा वाटले होते की दोन्ही आघाड्यांना चांगली मत मिळतील आणि दोघांनाही आपली गरज भासेल. आणि आपल्याला त्यांच्याकडून पाहिजे तेवढे पैसे उकळता येतील. किंवा मंत्रीपद पदरात पाडून घेता येईल. पण त्यांचा तो भ्रमाचा भोपळा अखेर फुटला. या निवडणुकीत तर सगळ्यात जास्त नुकसान कोणाचे झाले असेल तर ते अपक्षांचे नुकसान झाले आहे .अपक्ष अक्षरशः बेरोजगार झाले. त्यांच्या हातात आता काहीही राहिले नाही. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील कामे करून घेण्यासाठी त्यांनी नाक घासत सत्ताधारी पक्षा समोर सिरेडर व्हावे हेच त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.पण या निवडणुकीने घोडेबाजाराला पूर्णविराम दिला हेच या निवडणुकीचे खरे फलित म्हणावे लागेल.