रिझर्व्ह बँकेला बॉम्बच्या धमकीचा ई मेल
मुंबई- अरबी समुद्रात भारताच्या जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याची माहिती ताजी असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ई-मेलद्वारे धमकीचा मेसेज आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. खिलाफत इंडिया नावाच्या ई-मेल आयडीवरुन ही धमकी देण्यात आलीय. आरबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. आरबीआयच्या ई-मेल आयडीवर आज सकाळी साडेदहा वाजता ई-मेल आला होता. या ई-मेलमध्ये आज दुपारी दीड वाजता मुंबईतील ११ ठिकाणी बॉम्बस्फोट होतील. आम्ही मुंबईतील ११ ठिकाणी हे बॉम्ब ठेवले आहेत, अशी धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती.
या ई-मेलच्या माध्यमातून काही मागण्यादेखील करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं नाव घेऊन एक मोठा घोटाळा देशात केला जातोय. त्यामुळे गव्हर्नर आणि निर्मला सीतारमण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी ई-मेलमध्ये करण्यात आली होती. तसेच गव्हर्नर आणि निर्मला सीतारमण यांनी राजीनामा न दिल्यास मुंबईतील ११ ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली होती