गोळ्या घातल्या तरी आता मागे हटणार नाही – जरांगेचा राज्य सरकारला गंभीर इशारा
औरंगाबाद -आम्ही ओबीसी कुणबी हे सिद्ध झालं मग आम्हाला उगाचच स्वतंत्र आरक्षणाच्या फुफाट्यामध्ये कशाला टाकत आहात, असं आमचं म्हणणं आहे. नाही तर पोरांचे हाल होतील. आम्ही ते नाकारलं नाही पण ते आरक्षण टिकलं पाहिजे, ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे. नाही तर तोच पाढा पुन्हा वाचावा लागेल. सरकार आम्हाला २० तारखेपर्यंत आरक्षण देईल, असे वाटत नाही. त्यामुळे आम्ही मुंबईला जात आहोत. आम्ही मुंबईत पोहोचल्यानंतर मराठा समाज हा वारुळातील मुंग्यांसारखा बाहेर पडेल. मग तिकडे आम्हालागोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. ते बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
छत्रपती संभाजी नगर शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आम्ही मागासवर्ग आयोगाचे मुद्दे वाचले, ते खूप मोठं आहे. आमचं नियोजन पण सुरू आहे. तो ५० टक्क्यांच्या वरचा प्रश्न आहे. मुंबईतील मोर्चासंदर्भात व मार्गासंदर्भात उद्या सविस्तर माहिती देऊ. आम्ही मुंबईला चालत जाणार आहोत. आम्ही मरायलाही तयार आहोत. मात्र, सरकारने ठरवलं ते सरकार करते. जनतेच्या मनाप्रमाणे होत नाही. अंतरवाली सराटीत उपोषण सोडताना त्यांनी जे शब्द दिले त्या शब्दाला जागा. अन्यथा आम्ही मुंबईला जाण्यासाठी ठाम आहोत, असे जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले. मी शेंडगे यांच्याबद्दल बोलणार नाही. दबाव फिबाव नाही. आम्ही हक्काचं मागत आहे. धनगर आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी शक्ती लावावी इकडे तिकडे शक्ती वाया घालू नये. ते जेष्ठ नेते आहेत. आमदार अडवले की नाही ते मला माहित नाही, कुणी अडवले माहीत नाही. त्यांच्या त्यांच्यात चालत ते आमच्यावर घालतात. केंद्र सरकारकडून पाठ थोपटण्यासाठी आमच्यावर कारवाई केली जात असेल. एकट्याला खुश ठेवण्यासाठी हे सगळं सुरू आहे. मात्र मराठ्यांशिवाय पर्याय नाही, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.