आरोपी कुणाच्या कितीही जवळचा असो फाशी द्या – संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंनी तोंड उघडले
मुंबई – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी बीडच्या मस्साजोग प्रकरणावर आपली विस्तृत भूमिका स्पष्ट केली. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडू नका. त्याला थेट फासावर चढवा, असे ते म्हणालेत. त्यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.
म स्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचे नाव आल्यामुळे प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी उपरोक्त मागणी करत प्रस्तुत प्रकरणावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
धनंजय मुंडे यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या झाली. ज्यांनी कुणी ही हत्या केली त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. ते फासावर गेले पाहिजेत, असे माझे पहिल्या दिवसापासून मत आहे. संतोष देशमुखही शेवटी माझ्याच जिल्ह्याचा सरपंच होता. मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे. आता यात जे कुणी गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा. मग ते कुणीही असो.आरोपी कुणाच्या कितीही जवळचा असला, अगदी माझ्याही जवळचा असला तरी त्याला सोडायचे नाही ही माझी भूमिका आहे. पण त्यानंतरही केवळ राजकारणासाठी माझ्यावर काही जणांनी आरोप करणे, यामागे कोणते राजकारण असू शकते? हे आपण समजू शकता, असे ते म्हणाले.