पोमणमध्ये बिल्डरांकडून शेतकऱ्याची फसवणूक
बोगस कागदपत्रांद्वारे वीज मीटर केले नावावर
वसई :वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर वसईतील राखीव, मालकी, आदिवासी भूखंडांचा व त्यापाठोपाठ आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पैशाच्या बळावर उड्या मारणारे विकासक प्रशासकीय यंत्रणा पैशाने विकत घेऊन सर्वसामान्य नागरिकांनाच देशोधडीला लावू लागली आहे. पोमणमध्येे असाच एक लांडीलबाडीचा प्रकार उघडकीस आला असून दोघा बिल्डरांनी बोगस कागदपत्रांच्या सहाय्याने एका सर्वसामान्य कुटुंबाच्या शेतघराची बोगस घरपट्टी तयार करून त्याच घरमालकाच्या नावे असलेले वीज मिटरदेखील स्वत:च्या नावावर करून घेण्याचा प्रताप केला आहे. याप्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधित रंगा-बिल्ला पदमशी गजरा व हरीष व भानुशाली यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोमणमधील सर्वसामान्य तांगडी कुटुंबाने केली आहे.
याबाबत तांगडी कुटुंबाने वालीव पोलीस ठाण्यात तशी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पोमणमधील तांगडी कुटुंबाची वडीलोपार्जित कब्जेवहीवाटीची जागा असलेल्या सर्व्हे क्र. 116/1/3 या शेतावर तांगडी कुटुंबियांचे शेतघर आहे. या शेतघराची घरपट्टी सन 2017-18 या सालात तांगडी कुटुंबियांच्या नावे असल्याचे पोमण ग्रामपंचायतीच्या दफ्तरी दिसून येते. मात्र सन 2017-18 सालची सदर शेतघराची घरपट्टी ही सदर रंगा-बिल्ला
बिल्डरांनी बोगस तयार करवून त्या बोगस दस्तावेजाच्या साह्याने वीजमिटर त्यांच्या नावावर करून करून घेतल्याचे तांगडी यांनी आरोप केला आहे. यावरून मोठी फसवणूक झाली असून तांगडी कुटुंबियांनी याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार करून गजरा व भानुशाली बिल्डरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केेली आहे.
सध्या वसईत शेतकर्यांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. प्रशासकीय यंत्रणेने अशा फसवणुकीपासून आळा घालण्यासाठी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. पोमणमध्ये सध्या बेकायदा बांधकामांचा धुडगूस सुरू आहे. सरकारी जागा बळकावल्या जात आहेत. पोमणमध्ये मुंबईतील बिल्डर पदमशी गजरा व हरेश भानुशाली यांनी बविआच्या एका बड्या नेत्याच्या वरदहस्तामुळे मोठ्या प्रमाणावर जागा खरेदी करून त्यावर बेकायदा बांधकामे उभी केली आहेत. तसेच गुरचरण जागेवर रस्ता उभारला असल्याची चर्चा होत आहे. त्यांच्या प्रकाराला महसूल यंत्रणेचीदेखील साथ मिळत असल्याचे बोलले जाते.