जामनेरमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी कुस्ती दंगल
‘नमो कुस्ती महाकुंभ’ नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा मंत्र
जळगांव, (क्रीडा प्रतिनिधी) : आपल्या लाल मातीतला रांगडा खेळ आणि खेळाडूंना स्फूर्ती देणारी कुस्ती आता देशाच्या नव्या पिढीला निर्व्यसनी करण्यासाठी कुस्ती दंगल करणार आहेत. कुस्तीच्या माध्यमातून निर्व्यसनी पिढीचा संदेश खेळाडूंपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामविकास, पर्यटन मंत्री, आमदार गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथे ‘नमो कुस्ती महाकुंभ’ नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा, या देशातील सर्वात मोठ्या कुस्ती दंगलचे आयोजन येत्या ११ फेब्रुवारीला केले जाणार आहे.
या अभूतपूर्व स्पर्धेत महाराष्ट्रासह दिल्ली, हरयाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, कर्नाटक येथील पैलवान आपला दम दाखवतील. या दंगलीचे विशेष आकर्षण म्हणजे विश्वविजेता, अर्जुन पुरस्कार विजेता, हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद, महान भारत केसरी, महाराष्ट्र केसरी व उपमहाराष्ट्र केसरी हे सारेच दिग्गज पैलवान सहभागी होणार आहेत. एकाच मंचावर इतके दिग्गज खेळाडू खेळण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या दंगलच्या निमित्ताने जामनेरमध्ये कुस्तीप्रेमींना एक अद्भुत दंगल अनुभवायला मिळणार आहे.
अवघ्या कुस्ती विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधणार्या कुस्ती महाकुंभाविषयी आयोजक आणि आमदार गिरीष महाजन म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने हा महाकुंभ आम्ही घेतोय. हा महाकुंभ केवळ श्रीरामाच्या कृपेने तरुण पिढी व्यसनमुक्त व सशक्त व्हावी, हाच या कुस्ती दंगलमागचा उद्देश आहे. खानदेशमधे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुस्ती दंगल आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. खानदेशवासियांना भारतातील दिग्गज पैलवान पाहाता येतील. नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा संदेश देत आम्ही ही दंगल आयोजित करत असल्याची माहितीसुद्धा गिरीष महाजन यांनी दिली. या कुस्ती महाकुंभनिमित्त देशातील माजी नामांकित पैलवान हजेरी लावणार असून देश विदेशातील कुस्तीप्रेमीसुद्धा आवर्जुन येणार आहेत. त्यामुळे सामाजिक संदेशाबरोबर या दंगलीचे आयोजनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल, असे गिरीष महाजनांनी सांगितले.