सोलापुरात पवार गटाला धक्का – ओबीसी नेते रमेश बारस्कर शिंदे गटात जाणार
सोलापूर/ कारण मविआमधील अनेक नेते सत्ताधारी महायुतीला हात देत आहेत. त्यातच सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत.
आता शिंदे गटाकडून शरद पवार गटाला सुरुंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे. सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीनवेळा भेट घेतली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या उपस्थितीत बारसकर हे येत्या दोन दिवसांत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक, दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते. मात्र सध्या त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवरून पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे
