ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

विरोधकांचे शेतकऱ्यांप्रतीचे प्रेम पुतना मावशीचे

आमदार प्रविण दरेकर विधान परिषदेत आक्रमक

मुंबई- विधानपरिषदेचे दुसऱ्या दिवसाचे कामकाजही विरोधकांच्या गदारोळामुळे स्थगित करण्यात आले. कांदा आणि कापसाच्या प्रश्नावरून विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत असताना विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी भाजपा गटनेते प्रविण दरेकर हे चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांचे शेतकऱ्यांप्रती असलेले प्रेम हे पुतना मावशीचे आहे. त्यांची नौटंकी सुरु आहे. सरकार चांगल्या पद्धतीने उत्तर देतेय ते विरोधकांना नकोय, असे खडेबोलही दरेकर यांनी सुनावले.

राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. कांद्याला दोन रुपये भाव मिळत असल्याने महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले होते. विधान परिषदेच्या कामकाजाला दुपारी १२ वाजता सुरुवात झाली. त्यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २८९ नुसार कांद्याच्या प्रश्नावर सरकारने चर्चा करावी अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देत असताना विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विरोधकांच्या गोंधळामुळे सुरुवातीला १५ मिनिटांसाठी त्यानंतर २५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले.

सभागृहाला पुन्हा सुरुवात झाली मात्र विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. यावेळी भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या महत्वाच्या विषयावर २८९ मांडला आहे. यावर या सरकारने तात्काळ दखल घेतली. याआधी असे कधीही झाले नव्हते. उपमुख्यमंत्री स्वतः उत्तर देत आहेत. यासंदर्भात काय करणार आहे याबाबत तपशीलवार उत्तर देत असताना विरोधकांना केवळ नाटक करायचे आहे. त्यांना उत्तर नको आहे. सरकार चांगल्या पद्धतीने उत्तर देत आहे ते विरोधकांना नको आहे. केवळ शेतकऱ्यांना नौटंकी दाखवायची आहे. शेतकऱ्यांबाबत विरोधकांना कळवळा नाही. विरोधकांचे शेतकऱ्यांप्रती पुतना मावशीचे प्रेम आहे. यांनी शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे, असेही दरेकर यावेळी म्हणाले.


error: Content is protected !!