मुंबईत गृहनिर्माण सहकारी संस्थांची-१३ व १४ मे रोजी भव्य परिषद होणार
मुंबई- मुंबई जिल्हा हौसिंग फेडरेशन आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मुंबईत पहिल्यांदाच भव्य अशा गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या दोन दिवसांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १३ मे आणि रविवार १४ मे रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर ही परिषद संपन्न होणार आहे, अशी माहिती भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी दिली. ही परिषद मुंबईकरांच्या गृहनिर्माण चळवळीला एक दिशा आणि दिलासा देणारी ठरेल, असा विश्वास यावेळी दरेकर यांनी व्यक्त केला.
परिषदेबाबत सविस्तर माहिती देताना आ. दरेकर म्हणाले की, परिषदेच्या पहिल्या दिवशी विविध प्रकारच्या स्टॉल्सचे प्रदर्शन, हौसिंग फेडरेशनची माहिती देणारे स्टॉल्स, वेगवेगळ्या प्रकारचे सेल्फ डेव्हलपमेंटचे स्टॉल्स तसेच या परिषदेशी पूरक असणारे स्टॉल्स असतील. त्याचबरोबर या परिषदेचे संयोजन जिल्हा हौसिंग फेडरेशन, जिल्हा बँकेने केले आहे. हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, सिद्धार्थ कांबळे हे या परिषदेचे निमंत्रक असणार आहेत.
दरेकर पुढे म्हणाले की, या परिषदेचे उदघाटन १३ मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तर परिषदेच्या समारोपाचे जे सत्र आहे त्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, भाजपा आमदार आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होईल, काही ठराव होतील. सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वा. पर्यंत परिसंवादाने समाविष्ट असणारे अधिवेशन असेल. उदघाट्नच्या सत्रात डिम्ड कनव्हेन्स या विषयावर मार्गदर्शन होईल. शासनाने डिम्ड कन्व्हेन्स केले परंतु आजही डिम्ड कन्व्हेन्स होत नाही. या संदर्भात अनेक अडचणी आहेत. त्यावर चर्चा, उहापोह होईल आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री काही निर्णय घेतील अशी अपेक्षा असल्याचेही दरेकर म्हणाले.
तसेच गृहनिर्माण संस्थांचे अनेक प्रश्न आहेत. त्याबाबत राज्याचे सहकार आयुक्त मार्गदर्शन करणार आहेत. दुपारनंतर दुसरे सत्र सुरु होईल. त्यात सहकार मंत्री अतुल सावे हे अध्यक्ष असतील. राज्याचे सहकार सचिव अनुप कुमार, नगरविकास सचिव भूषण गगराणी, महापालिका आयुक्त इकबाल चहल आणि जॉईंट रजिस्टार शिंदे असतील. सहकार आणि नगर विकासाशी संबंधित जे विषय आहेत त्यावर पॅनल चर्चा होईल. त्या परिसंवादाच्या समारोपाला मंत्री उत्तर देतील आणि समाधान करण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर दुपारी ३ ते ४ हे महसूल मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जमीन हस्तानतरण, एनए टॅक्स आदी विषय चर्चीले जातील. राज्याचे महसूल सचिव नितीन करीर, गृहनिर्माण सचिव वलसा नायर, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर आदी या विषयाशी संबंधित उपस्थित असतील, असेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हटले की, मुंबई बँकेने ज्या करिता धोरण बनविले त्या स्वयंपुनर्वीकास या महत्वाच्या विषयावर दुपारी ४ वाजता चर्चा होणार आहे. आज मुंबई बँकेच्या फंडिंगने ७ सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. बिल्डर चारशे-साडेचारशेचे घर द्यायला तयार होत नसताना आज ८०० स्क्वे. फुटाची घरे स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून निर्माण झाली आहेत. त्याची प्रक्रिया काय?, अंमलबजावणी कशी होईल? याबाबत या सत्रात मार्गदर्शन होणार आहे.
चौकट
परिषदेत मुंबईकरांसाठी
मोठा निर्णय होणार
आम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, जो जीआर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना काढला होता दुर्दैवाने त्यावर कार्यवाही झाली नाही. त्याची अंमलबजावणी तात्काळ करा ही मागणी आमची असणार आहे. सांगायला आनंद वाटतो की परिषद व्हायच्या अगोदरच देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात सूचना दिल्या आहेत व या जीआरची अंमलबजावणी करायला मंत्रालयीन प्रशासक यंत्रणा कामाला लागली आहे. तो मोठा निर्णय मुंबईकरांच्या दृष्टीने होणार आहे. तसेच या परिषदेच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजाचे विश्लेषण मी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून परिषदेत करणार आहे. परिषदेचे समारोपीय मार्गदर्शन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, असेही दरेकर म्हणाले.