सातारा रत्न पुरस्कारांने डॉक्टर सुनील तांबवेकर सन्मानित
मुंबईतील सातारकरांच्या संकल्पित भवनाचे झाले शानदार उद्घाटन
मुंबई आणि परिसरातील सातारकरांसाठी असलेल्या संकल्पित सातारा भवनचे शानदार उद्घाटन आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने दादर येथील शिवाजी मंदिर येथे आयोजित मेळाव्याचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सातारकरांनी जयघोषात स्वागत केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांना सातारा रत्न आणि सातारा भूषण पुरस्कारानेही यावेळी सन्मानित करण्यात आले.
सेवागिरी संस्थान पुसेगाव महंत सुंदरगिरी महाराज यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कायम सद्गुणांचा मार्ग अवलंबिवावा, असे सांगितले तर मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सातारकरांना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुंबईत लौकिक प्राप्त करण्यासाठी कार्य करण्याचा सल्ला दिला तसेच मुंबईच्या विकासातील सातारकरांचा महत्व विशद केले.
संकल्पित सातारा भवनच्या माध्यमातून मुंबईत येणाऱ्या सातारकरांना केवळ निवारा नव्हे तर यातून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सर्वांचा विकास करण्याचा मनोदय असल्याचे विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना निकम यांनी सांगितले. प्रा. यशवंत पाटणे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ज्ञानदीप पतसंस्थेचे जिजाबा पवार तसेच अन्य मान्यवरांनीही समयोचित विचार व्यक्त केले. माजी आमदार आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाबुराव माने आणि एडवोकेट राजाराम शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कराड अर्बन बँकेचे चेअरमन सुभाष एरम, उपाध्यक्ष सुभाष जोशी, शिवकृपा पतसंस्थेचे संचालक चंद्रकांत वंजारी, सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबै बँकेचे संचालक आनंदराव गोळे, शिवसहयाद्री पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. पिंपळे, पुष्पक पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. पवार आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.
यावेळी सातारा भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर पुढीलप्रमाणे – शरद कणसे (राजकीय), राजेंद्र शिंदे (कला), संजय गायकवाड (कामगार), गोपाळ वरखडे (क्रिडा), प्रा. यशवंत पाटणे (साहित्य), सुभाष मोरे (शैक्षणिक), राजेंद्र चोरगे (सामाजिक), कांचन कुचेकर (उद्योग), अभिजीत कारंडे (पत्रकारिता), डॉ. सुनील तांबवेकर (वैद्यकीय), क्रांती मोरे (कायदा), राजेंद्र भोसले (प्रशासकीय), गोरख चव्हाण (सहकार). साताराभूषण विजेत्यांची नावे अशी – दिलीप गुरव, जयदीप शिंदे, नामदेव मांढरे, दत्तात्रय शिंदे, प्रमोद यादव-सोळुस्कर, सुहास बांदेकर. संतोषशेठ साळुंखे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.