ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पोलिसांच्या लाठीमारानंतर रिफायनरी विरुद्धचे आंदोलन- ३ दिवसांसाठी स्थगित प्रकरण पुन्हा चिघळणार

राजापूर – रिफायनरीविरोधात बारसूमध्ये सुरू असलेले आंदोलन आज चिघळले. पोलिसांनी रिफायनरीच्या माती सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. त्याशिवाय, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक ग्रामस्थ जखमी झाले. पोलिसांच्या कारवाईनंतर जिल्हाधिकारी, कोकण परिक्षेक्षत्राचे पोलीस महानिरीक्षक दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना चर्चेचे आवाहन केले. मात्र, ग्रामस्थांनी याला विरोध करत पाठ फिरवली.

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह आंदोलन स्थळी दाखल झाले. त्यांनी चर्चेचे आवाहन उपस्थितांना केले. मात्र, स्थानिकांनी या चर्चेवर बहिष्कार घातला. मागील काही दिवसांपासून माती सर्वेक्षण सुरू आहे. त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. मात्र, प्रशासन आणि पोलिसांकडून आंदोलकांवर दडपशाही सुरू असल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात येणार असल्याचे आश्वासन कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकांनी दिले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तरीदेखील ग्रामस्थांनी चर्चेकडे पाठ फिरवली.

जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, प्रशासनाकडून मागील महिनाभरापासून चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांच्या प्रकल्पाबाबत असलेल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न होत आहे. गुरुवारी, राजापूरमध्ये प्रशासन, रिफायनरी समर्थक, विरोधक संघटनांची बैठक झाली. या बैठकीत तज्ज्ञदेखील सहभागी होते. जवळपास अडीच तास चर्चा झाली. प्रशासनाकडून स्थानिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक गावकऱ्यांनी आपले प्रतिनिधींची नावे द्यावीत, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू असे आवाहनही त्यांनी केले.

कोणालाही तडीपार केले नसून काहींना जिल्हाबंदी, तालुका बंदी घातली असल्याची माहिती जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी दिली. ज्यांच्यावर अशाप्रकारची कारवाई झाली, त्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी लाठीचार्जचे वृत्त फेटाळून लावले. माती सर्वेक्षणासाठी होत असलेल्या बोरिंगकडे ग्रामस्थांनी जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडवताना झटापट झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये काही ग्रामस्थांसह पोलीस, महिला पोलीस कर्मचारी जखमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रिफायनरी विरोधी ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये काही ग्रामस्थ जखमी झाले आहेत. आता, रिफायनरी विरोधी आंदोलकांनी तीन दिवस आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे. माती परिक्षण तीन दिवस थांबवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. रिफायनरीविरोधी स्थानिक आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, अटक करण्यात आलेल्यांची तात्काळ सुटका करा अशी मागणी रिफायनरीविरोधातील स्थानिक नेते काशीनाथ गोरिले यांनी केली आहे. तीन दिवसात माती परीक्षण न थांबवल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.

error: Content is protected !!