आमचे सरकार आल्यास देशात जातीय जनगणना – नागपूरच्या काँग्रेस मेळाव्यात राहुल गांधींची घोषणा
नागपूर- राज्यात आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. मराठा समाज आरक्षणसाठी आक्रमक झालाय. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी मागणी केलीय. तर त्यावरुन ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी समाजाचं हक्काचं आरक्षणात कुणाला वाटा देऊ नये, अशी ओबीसी नेत्यांची भूमिका आहे. तर धनगर समाजाची देखील आरक्षणाबाबत महत्त्वाची मागणी आहे. देशात धनगर समाज म्हणून जो उल्लेख आहे त्याचा अर्थ धनगर असा होतो. त्यामुळे धनगर समाजालाही त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं, अशी त्यांची मागणी आहे. राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये आरक्षणाबाबत मागण्या आहेत. त्यामुळे सर्वात आधी जातीय जनगणेनीची मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार पडलेल्या बौद्धिक शिबिरात संघाचे विदर्भ सरसंघचालक श्रीधर घाडगे यांनी भूमिका जाहीर केली होती. यावेळी त्यांनी जातीय जनगणनेची गरज नाही, असं म्हटलं. पण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रात येऊन याबाबत मोठी घोषणा केलीय
काँग्रेस पक्षाचा आज १३९ वा वर्धापन दिवस आहे. या दिनाच्या निमित्ताने नागपुरात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राहुल गांधी यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी जातीय जनगणनेबाबत भूमिका स्पष्ट केली. आमचं सरकार आलं तर सर्वात आधी देशात जातगणना केली जाईल, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं.