आर्थिक दृष्ट्या हलाखीत जीवन जगणाऱ्या पत्रकाराने सरकारी जाचक अटींच्या तिरडीवरुनच सरणावर जावे अशी अपेक्षा आहे काय ?
साधारणतः नव्वदच्या दशकातील या घटना. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मित्रवर्य प्रकाश देशमुख हे अध्यक्ष आणि मी कार्यवाह होतो. मी दैनिक सामना तर्फे राजकीय म्हणजे मंत्रालय आणि विधिमंडळ परिसरात वार्तांकन करीत होतो. प्रकाश देशमुख हे सकाळचे प्रतिनिधी होते तर विजय साखळकर हे धावते नवनगर चे काम पहात असत. विजय नंतर संपादकही झाला. रोज आम्ही मंत्रालयातून दैनंदिन बातम्या मिळवून योगक्षेम जवळून मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या अर्थात बेस्टच्या ८७ नंबरची बस पकडायचो. मंत्रालय ते शासकीय वसाहत, वांद्रे अशी ही बस होती. आजही आहे. या बसने प्रकाश, विजय आणि मी रोज न चुकता प्रवास करायचो. प्रकाश आमच्या पेक्षा मोठा आणि आम्ही दोघे त्याच्या पेक्षा लहान म्हणून त्याचे नांव मोठा मासा आणि आमचे नांव छोटा मासा. आम्ही तिघे एकमेकांना एमेम आणि सीएम म्हणत असू. एमेम म्हणजे मोठा मासा आणि सीएम म्हणजे छोटा मासा. तशी आम्हा तीघांची आर्थिक परिस्थिती बेताचीच. अजूनही काही श्रीमंत झालेलो नाही. हां मनाने आणि जनसंपर्काच्या दृष्टीने तसे श्रीमंत आहोत. प्रबोधनकार ठाकरे यांच्या शब्दांत सांगायचे तर ज्याच्या दरवाजाबाहेर पादत्राणे जास्त तो श्रीमंत मानावा. तसे आम्ही श्रीमंत. मंत्रालय येथून ८७ नंबर बसने निघालो की प्रभादेवीच्या बाबासाहेब वरळीकर चौकात उतरायचो. प्रकाश नेहमी बस वाहकाला (कंडक्टर) सांगायचा बाबासाहेब वरळीकर चौकाची तिकिटे द्या. बेंगॉल केमिकल जवळचा बस थांबा असल्याने प्रवासी बेंगॉल केमिकल स्टॉप सांगायचे. पण प्रकाश ला ते पटायचे नाही. आपण काय बेंगॉल केमिकल चे पीआरओ आहोत कां ? असा त्याचा बिनतोड मुद्दा असायचा. बस वाहकाला तो सांगायचा वरळी नाही वरळीकर चौक. कारण मंत्रालय येथून येतांना वरळीनंतर प्रभादेवीचा बस थांबा होता (आजही आहे). मग बस थांब्यावर उतरुन थोडे चालत जाऊन आदर्श उपहारगृहात जायचे. तिथे तिघांनी उसळ पाव खाऊन प्रकाश सकाळच्या कार्यालयात (तेंव्हा प्रभादेवीला सकाळ कार्यालय होते), मी सामनामध्ये आणि विजय साखळकर पुढे जायचा. मग तो दादर नायगावच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे कट्ट्यावर ही नित्यनेमाने जात असे. आमच्या तिघांच्या सातत्याने चर्चा होत असत. कुणाकडे आर्थिक, चणचण असली आणि पैसे हवे असले की मग प्रकाश आम्हाला विचारायचा, “आज देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे?” मग आम्ही एकमेकांना आर्थिक हातभार लावायचो. कुणी खास बातमी, खास लेख लिहिला की एकमेकांना देवाण घेवाण व्हायची. प्रकाश दीनदुबळ्या, गोरगरीब, झोपडपट्टी वासियांमध्ये सातत्याने फिरायचा. मुंबई मधल्या बव्हंशी झोपडपट्ट्यांमध्ये तो पायी फिरायचा त्यांचे दुःख समजून घेऊन त्यांना सरकार दरबारी मांडायचा. विजय साखळकर हा गुन्हेगारी जगतातील खबरी तंतोतंत काढायचा. त्यावर त्याचा गाढा अभ्यास होता. क्राईम रिपोर्टिंगचा बेताज बादशहा असेच त्याला म्हणायचे. दिवाळी अंकांना तो तर लेखांचा अक्षरशः रतीब घालत असे. कादंबऱ्या लिहिणे तर त्याच्या हातचा मळ असे. प्रकाश देशमुख यांनी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे १७ मे २००८ रोजी कोपरखैरणे येथील एमजीएम इस्पितळात इहलोकीची यात्रा संपविली. विजय साखळकर पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहापासून दूर झाला. तरी मधून मधून चर्चगेट, दादर ला भेटीगाठी व्हायच्या. गेल्या वर्षभरापासून तो आजारी होता. दहिसरच्या नवनीत इस्पितळात उपचार सुरु होते. नंतर घरात पडला. पायाचे हाड मोडले. वयाच्या ६४ व्या वर्षी हाडे ठिसूळ झाल्यामुळे शस्त्रक्रिया होऊ शकली नाही आणि वांद्रे येथील इस्पितळात त्याने अखेरचा श्वास घेतला. विजयच्या पत्नीने विजय गेल्याची बातमी कळवली. भारत कदम, प्रमोद डोईफोडे, विनोद यादव यांच्या समवेत आम्ही दहिसर येथील श्री समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीत पोहोचलो. तिथे त्याचे पार्थिव ठेवले होते. विजयला असा निश्चेष्ट पहायची वेळ येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. वहिनींचे अश्रू थांबत नव्हते. नातलग आले, सहकारी संस्थेचे पदाधिकारी धावून आले. माणुसकी जिवंत असल्याचे जीते जागते उदाहरण पहायला मिळाले. आदल्याच दिवशी श्री सत्यनारायणाची महापूजा त्या इमारतीत पार पडली होती. विजयने ही महापूजा पार पडू दिली आणि आपला देह ठेवला. मंत्रालय वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप मसूरकर हे विजयचे मेहुणे, आर आर तेंडुलकर, श्री समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव, खजिनदार रत्नाकर सावंत आदी असंख्य मंडळींनी विजयला अखेरचा निरोप दिला. पत्रकार म्हणून नावाजला पण खिसा फाटकाच राहिला. खऱ्यांच्या विनयनंतर साखळकरांच्या विजयचीही अशीच आर्थिक हलाखीची परिस्थिती. पत्रकारांसाठी गतिमान शासन काही करणार की पत्रकार स्वतः ला असेच ‘शासन’ करुन घेणार ? हे न सुटणारे कोडे आहे. ३० सेकंदात निर्णय जाहीर होतो पण शासन निर्णय लालफितीतून बाहेर येत नाही. विज्या, काही नाही रे बाबा ! जयंत पवार यांच्या कादंबरीवर महेश मांजरेकर यांनी काढलेल्या चित्रपटाचे शीर्षक खरे आहे. ‘वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ ! आर्थिक दृष्ट्या हलाखीत जीवन जगणाऱ्या पत्रकाराने सरकारी जाचक अटींच्या तिरडीवरुनच सरणावर जावे अशी अपेक्षा आहे काय ? विजय साखळकर यांच्या पवित्र स्मृतींना मानाचा मुजरा ! -योगेश वसंत त्रिवेदी, . (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).