प्राजक्ता माळी बाबतच्या वादग्रस्त विधानाबाबत सुरेश धस यांची दिलगीरी
बीड - महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यामध्ये संतोष देशमुख प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.पण परळी पॅटर्नचा उल्लेख करत सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांचं नाव घेत खळबळजनक दावा केला होता. त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. भाजप नेत्यांनीच कान टोचल्यानंतर आता आमदार सुरेश धस यांनी एक पाऊल माघारीचं टाकत दिलगिरी व्यक्त केली आहे.
सुरेश धसांच्या वक्तव्यानंतर संतापलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीनं वादळी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात धस यांनी आपली माफी मागावी अन्यथा कडक कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर तिने सीएम फडणवीसांची भेट घेतली होती. तसेच राज्य महिला आयोगात तक्रारही दाखल केली होती. याचवेळी महायुतीतील नेत्यांनीही धस यांची चांगलीच कानउघडणी केली होती. याच सगळ्या घडामोडींनंतर आता सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे
सुरेश धस म्हणाले, मी ग्रामीण भागातला आहे,त्यामुळे मी केलेल्या वक्तव्याचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला आहे.माझ्या बोलण्याने कोणाची भावना दुखावली गेली असेल तर याबाबत मला चंद्रकांत पाटील यांचा फोन आला. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. मी माफी-बिफी मागत नसतो असं म्हणणाऱ्या धस यांनी प्राजक्ता माळी यांचं जर मन दुखावलं असेल तर प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असा दोनच दिवसांत यू टर्न घेतल्याचं दिसून येत आहे.
ते म्हणाले, प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ काढण्यात आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषय नव्हता. मी प्राजक्ताताईसह सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने, त्यांचे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करत असल्याचं धस यांनी म्हटलं आहे.