ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

..जेंव्हा तिसऱ्या वर्गातील १४४ गुजराती छोटी छोटी मुले ‘जाणता राजा’ उभा करतात ! ।

….

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद धराशायी झाल्यावर संपूर्ण हिंदुस्थानात वातावरण बदलले. हिंदुंमध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले. लाखो कारसेवकांनी आक्रमणकारी बाबराचे नामोनिशाण पुसून टाकले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते सुंदरसिंह भंडारी यांनी काखा वर केल्या आणि बाबरी उद्ध्वस्त करणारे आर एस एस चे नव्हते, बजरंग दलाचे नव्हते, विश्व हिंदू परिषदेचे नव्हते असे नीक्षून सांगितले. तेंव्हा पत्रकारांनी सुंदरसिंह भंडारी यांना विचारले की मग बाबरी उद्ध्वस्त कुणी केली ? तेंव्हा त्यांनी, शायद वह शिवसेना के होंगे, असे सांगितले. याचवेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी ठणकावून सांगितले की जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान वाटतो. बाबरीच्या पतनानंतर मुंबई मध्ये दंगल पेटली. यावेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनी मुंबई महाराष्ट्रातील तमाम हिंदूंचे संरक्षण केले. शिवसेना होती म्हणून मुंबई सुरक्षित राहिली. मुंबईत गुण्यागोविंदाने नांदत असलेले गुजराती बांधव हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत होते. गिरगांव चौपाटी येथील सभागृहात गुजराती समाजाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य सत्कार केला. यावेळी बोलतांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले की, मुंबईत मराठी आणि गुजराती बांधव गुण्यागोविंदाने नांदत आहेत. दुधात साखर मिसळून जावी तशा प्रकारे मराठी आणि गुजराती बांधव राहताहेत. मी नेहमी म्हणतो की गुजराती बांधवांकडे लक्ष्मी आहे तर मराठी बांधवांकडे सरस्वती आहे. सरस्वती आणि लक्ष्मी यांनी हातात हात घालून एकत्र काम केले तर मुंबई महाराष्ट्राचा विकास निश्चित होऊ शकतो. पर्यायाने हिंदुस्थान प्रगतीपथावर जाऊ शकतो. २०१९ साली शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबतचे संबंध तोडून दोन्ही काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले. तेंव्हा पासून भारतीय जनता पक्षाचे नेते शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शिवसेनेने हिंदुत्व सोडले, मराठी बाणा सोडला, अशी टीका भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सातत्याने करीत आहेत. या पार्श्वभूमीवर माटुंगा येथील श्रद्धानंद मार्गावरील शिशुवन या शाळेतील लहान लहान १४४ चिमुकल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ हे महानाट्य सादर करुन एक इतिहास घडविला. विशेष म्हणजे ही चिमुकली मुले गुजराती भाषिक असून अवघ्या तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवकालीन इतिहास सादर केला. शिशुवन या शाळेतील प्रिन्सिपॉल प्राची रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख वैशाली संघवी यांनी दिग्दर्शक मंदार गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली हे महानाट्य उभे केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रेक्षागृहात चक्क सजविलेल्या घोड्यावर शिवराय राजाभिषेकासाठी अवतरले तेंव्हा ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी ‘ अशा बुलंद घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. पांढरा शुभ्र सजविलेला अश्व आणि त्यावर हाती तलवार घेतलेले छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आणण्याची अनोखी संकल्पना वैशाली संघवी यांनी मांडली आणि तिला प्राचार्या प्राची रणदिवे यांनी परवानगी देताच दिग्दर्शक मंदार गोखले यांनी हा संपूर्ण प्रसंग प्रेक्षागृहात प्रत्यक्ष उभा केला. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि गुलाब पाकळ्यांचा महाराजांवर उपस्थितांनी केलेला वर्षाव अंगावर रोमांच उभा करणारा होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवा शिवसैनिक, शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि पाचशे वेळा रायगडावर जाऊन शिवरायांची महती घराघरात आणि मनमनात पोहोचविणारे, एरव्ही खडानखडा शिवचरित्र सांगणारे ; रायगड, शिवनेरी, तोरणा, पन्हाळा अशा विविध गडांवर जाऊन शिवप्रेमींना खऱ्याखुऱ्या शिवचरित्राची ओळख करुन देणारे राजेश शांताराम उर्फ राजू देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी बोलतांना त्यांच्या मुखातून शब्द फुटत नव्हता. डोळ्यांतून अश्रू घळघळा वाहात होते आणि त्यांनी या १४४ गुजराती चिमुकल्या विद्यार्थी विद्यार्थिनींसमोर, प्राची रणदिवे आणि वैशाली संघवी, मंदार गोखले यांच्या समोर नतमस्तक होत अनोखी दाद दिली. तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या या गुजराती मुलांनी अवघ्या महाराष्ट्रासमोर एक आदर्श उभा केला शिवकालीन इतिहास जागृत केला आहे. एका बाजूला मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून संपूर्ण देशात शिवप्रेमी जनतेत कमालीचा संताप व्यक्त होत होता त्याच वेळी सुमारे एकशे चाळीस मुले, ती सुद्धा गुजराती, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ हे महानाट्य रंगमंचावर सादर करतात, ही खरोखरच अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना आहे, अशी प्रतिक्रिया शिवप्रेमींनी व्यक्त केली. नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, रंगमंचावर प्रसंगानुरूप होणारे बदल, वेगवेगळ्या संवादांची अचूक फेक करणारे बालशिवाजी सारे काही चपखल. याची वाखाणणी सातत्याने होत होती. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट जीवंतपणा जाणवून देत होता. या चिमुरड्या बालगोपाळांनी शिशुवनच्या प्रांगणात आपापल्या चिमुकल्या हातांनी गड किल्ले यांची निर्मितीही केली होती जी सर्वांना आकर्षित करीत होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नांव घेऊन सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांनी या बाल कलाकारांना प्रोत्साहन देऊन संपूर्ण महाराष्ट्रात या महानाट्याचे प्रयोग घडवून आणावेत. मुळात मुंबईत जन्मलेला गुजराती, व्यवसाय करणारा गुजराती बांधव बव्हंशी मराठी अस्खलित बोलण्यास कचरत असतो. या पार्श्वभूमीवर तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या गुजराती मुलामुलींनी मराठी भाषेत ऐतिहासिक महानाट्य सादर करावे, यासाठी प्राचार्या प्राची रणदिवे, विभागप्रमुख वैशाली संघवी आणि दिग्दर्शक मंदार गोखले तसेच त्यांचे संपूर्ण सहकारी प्रशंसेस पात्र आहेत. याचे अनुकरण सर्वत्र व्हावे, याचा आदर्श सर्व संबंधितांनी घ्यावा, खराखुरा इतिहास घराघरात आणि मनमनात पोहोचवावा, यासाठी सर्वांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो हीच शिवचरणी विनम्र प्रार्थना ! ऐतिहासिक आणि अभूतपूर्व महानाट्य घडवून आणणाऱ्या शिशुवनच्या तमाम बहाद्दरांना मानाचा मुजरा ! -योगेश वसंत त्रिवेदी,

error: Content is protected !!