बाळासाहेब ठाकरे हेच खणखणीत नाणे !
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात पार पडत आहेत. या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन गर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या पासून सर्वांनीच प्रचाराची रणधुमाळी गाजविली आहे. असे असले तरी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नांवाचे नाणे त्यांच्या महानिर्वाणाला एक तप होत आले तरी अजूनही खणखणीत असल्याचे यंदाच्या प्रचारात दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, अमित शाह असोत की देवेंद्र फडणवीस असोत , बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांची भाषणे पूर्णच होत नाहीत. दुसरे कोणतेही नाणे काम करीत नाही , असेच पावलोपावली दिसून येते. रविवार, १७ नोव्हेंबर २०२४, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा महानिर्वाण दिन. या निमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ५८ वर्षांपूर्वी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन केलेल्या आणि पुढे ज्वलंत हिंदुत्वाचा ज्वालाग्राही विचार पुढे नेणाऱ्या शिवसेनेच्या वाटचालीचा धांडोळा घेऊ या. ८०% समाजकारण आणि २० % राजकारण हे सूत्र घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली. त्यानंतर गेल्या ५८ वर्षांत अनेक स्थित्यंतरे, संकटे, जय, पराजयाचा ‘सामना’ करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री होण्याचा मान पटकाविला. भारतातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये श्री. उद्धव ठाकरे यांनी आपले स्थान निर्माण केले. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव झाला. अर्थात ७५ वर्षे होऊनही अजूनही अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे पाच मूलभूत प्रश्न पूर्णपणे सुटू शकलेले नाहीत. प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या निवडणूक जाहीरनाम्यात अजूनही या प्रश्नांचा समावेश केल्याशिवाय रहात नाही. शिवसेनेच्या संदर्भात विचार केला तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या दूरदृष्टीच्या नजरेतून या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पावले उचलल्याचे दिसून येते. १९९५ साली शिवशाही सरकार आले तेंव्हा एक रुपयात झुणका भाकर ही गोरगरिबांच्या पोटापाण्यासाठी महत्वपूर्ण योजना सुरु केली. १९७४ साली कृष्णा खोऱ्याचे ५४० टीएमसी पाणी अडविण्याचा करार होऊन सुद्धा एक रुपयाही त्यासाठी खर्च करण्यात आला नव्हता. परंतु शिवशाही सरकार येताच ५ हजार कोटी रुपयांचे रोखे काढण्यात येऊन कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. परिणामी पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा मजबूत पाया तयार झाला. ४० लाख झोपडपट्टी वासियांना मोफत घरे देण्याची महत्वाकांक्षी योजना १९९५ साली मूर्तस्वरुपात आणली तर २७ लाख बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करणारी आणि कामगार व औद्योगिक क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडविणारी योजना अंमलात आणली. डॉ. मनोहर गजानन जोशी, नारायण तातू राणे आणि दस्तुरखुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तीन मुख्यमंत्री शिवसेनेने महाराष्ट्राला दिले. तीर्थरूप दादा म्हणजेच प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी ब्रिटिश कालीन नगरपिते या पदाचे परिवर्तन नगरसेवक या पदात करतांना लोकांची सेवा, शहराची सेवा करणारा ‘नगरसेवक’ जनतेसाठी उपलब्ध करुन दिला. महापौरांना अधिकार देणारी महापौर परिषद अंमलात आणली. काही दळभद्री लोकांनी खा खा खाण्यासाठी या पदाचा उपयोग केला तेंव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दोन चुकीचे निर्णय घेतले आणि झुणका भाकरीचे अनुदान तसेच महापौर परिषद गुंडाळून ठेवले. आरोग्य सेवेसाठी शिवसेनेच्या रुग्णसेविका गावोगावी ते शहरोशहरी धावू लागल्या. महानायक अमिताभ बच्चन पासून सर्वसामान्य माणसाला याचा उपयोग होऊ लागला. प्रशासकीय सेवेत चांगली माणसे उच्च विद्याविभूषित व्यक्ती याव्यात म्हणून बाळासाहेब ठाकरे आय ए एस अकादमी सुरु करण्यात आली. शिक्षणासाठी विविध प्रकारच्या योजना अंमलात आणण्यात आल्या. झुणका भाकर पासून शिवभोजन थाळी पर्यंत लोकांच्या पोटाची भूक भागवू लागली. शेतकरी हा महाराष्ट्राचा कणखर कणा. या बळीराजाला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी महत्वपूर्ण योजना पुढे आणण्यात आली आणि ही महत्वाकांक्षी योजना धाराशिव (उस्मानाबाद) आणि यवतमाळ या मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी बहुल जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली. माननीय न्यायालयाने ही योजना शेतकरी बहुल सर्व जिल्ह्यात राबविण्यात यावी, अशी बहुमोल शिफारस केली. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून प्रारंभी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आणि सुरुवातीला पाचशे गरीब शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून दिला. सांस्कृतिक पातळीवर शिवसेनेच्या चित्रपट शाखा प्रख्यात विनोदवीर आणि विक्रमी रौप्यमहोत्सवी चित्रपट देणाऱ्या दादा कोंडके यांच्या वेळेपासून कार्यरत आहेत. शिवशाही सरकारची प्रतिष्ठापना होताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरु केले. प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या पासून तर शिवशाहीर बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे, नानासाहेब धर्माधिकारी, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आले. मग त्यात लतादीदी, आशा भोसले यांचा सुद्धा समावेश होतो. पायाभूत सुविधांचे तर प्रचंड जाळे तयार केले. मुंबई पुणे हा दृतगती महामार्ग हा त्यापैकी एक असून मुंबई नागपूर समृद्धि महामार्ग सुरु झाला. सागरी किनारा मार्गही अस्तित्वात आला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच कामे शीघ्रगतीने करण्यात आली, श्रेय घेण्यासाठी अहमहमिका सुरू आहे. संघटनात्मक पातळीवर शिवसेना पक्षप्रमुख, नेते, उपनेते, संपर्क नेते, संपर्क प्रमुख, सचिव, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी प्रमुख, विभाग संघटक, उपविभाग संघटक, शाखा संघटक अशी विविध पदे कार्यरत आहेत. शिवसेनेच्या शाखा ही लोकशाहीची न्याय मंदिरे म्हणून ओळखण्यात येतात. कामगारांच्या हितासाठी भारतीय कामगार सेना, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आणि शिवसेना प्रणित विविध प्रकारच्या संघटना कार्यरत आहेत ज्यायोगे कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पक्षाचे प्रवक्ते पक्षाच्या भूमिका, पक्षाची ध्येय धोरणे प्रसार माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवितात. १३ ऑगस्ट १९६० रोजी ‘मार्मिक’ हे जगातील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु करुन मराठी माणसात जाज्वल्य अंगार फुलविला. १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. १९६७ साली मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी ‘मार्मिक’ हे सायंदैनिक म्हणून ‘सांज मार्मिक’ या नावाने चालविले. याच बरोबर ठाणे नगरपालिका जिंकण्यासाठी ‘शिवगर्जना’ हे दैनिक चालविले. प्रसार माध्यमे/दैनिके शिवसेनेच्या भूमिका प्रसिद्ध करण्यात हातचे राखून वागत असल्याने ‘सामना’ हे दैनिक २३ जानेवारी १९८९ रोजी सुरु केले. हिंदुत्ववादी भूमिका शिवसेनेने स्वीकारली असल्याने अमराठी लोकांपर्यंत भूमिका पोहोचण्यासाठी दोपहर का सामना हे हिंदी दैनिक सुरु केले. मुंबई बरोबरच पुणे, संभाजीनगर, नाशिक, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र अशा आवृत्त्या सूरु झाल्या. शिवसेनेने आपल्या झंझावाती वाटचालीत सर्वस्पर्शी, सर्वतोपरी, सर्वतोमुखी कार्य करीत आपली घोडदौड सुरु ठेवली आहे. सत्तेचा उपयोग सर्वसामान्य माणसाला मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि युवा सेना प्रमुख पर्यटन, पर्यावरण मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन सर्वोत्तम कामगिरी केली आहे, त्याची पदचिन्हे पावलोपावली दिसून येत आहेत. राजकीय, सामाजिक, आदिवासी, महिला, युवक, दीनदलित, मागासवर्गीय अशा समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन शिवसेना गरुडझेप घेत आहे. महाविकास आघाडी म्हणून शिवसेना हा त्या आघाडीचा घटक पक्ष असल्याने गैरसमज पसरवून लोकांना संभ्रमित करण्याचे उद्योग शिवसेना द्वेषाने पछाडलेले उद्धव ठाकरे यांचे विरोधक करीत आहेत. परंतु शिवसेनेचा इतिहास माहित नसलेल्यांना काय सांगणार. १९६६ साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि त्यानंतर १९६७ साली इशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार स. गो. बर्वे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. बर्वे यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या भगिनी ताराबाई सप्रे यांनाही बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील यांना तसेच प्रणव मुखर्जी यांनाही राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला होता. मुरली देवरा हे कॉंग्रेसचे असूनही त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी महापौर बनविले. हिंदुत्वाबद्दल म्हणाल तर १९८७ साली विलेपार्ले येथील विधानसभेची पोटनिवडणूक डॉ. रमेश प्रभू यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढविली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात पहिल्यांदा हिंदुत्वाचा पुकारा केला. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली. तेंव्हा भारतीय जनता पक्ष जनता दलाच्या पाठीशी उभा होता प्राणलाल व्होरा यांना भाजपने पाठींबा दिला होता. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. भारतीय जनता पक्षाचे चाणक्य प्रमोद महाजन यांच्या लक्षात आले की शिवसेना हिंदुत्वावर जिंकू शकते तेंव्हा महाजन यांनी भारतीय जनता पक्षाची युती शिवसेनेबरोबर केली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी २००२ साली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बदलू नका असा निरोप लालकृष्ण अडवाणी यांच्या मार्फत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पाठविला. मोदी को हाथ मत लगाओ, मोदी गया तो समझो गुजरातसे भाजप गया, असे बाळासाहेब ठाकरे यांनी ठणकावून सांगितले होते. पण आज हिंदुत्वाचा ठेका आपणच घेतल्याचे भासवून लोकांना संभ्रमित करण्याचे उद्योग सुरू आहेत. परंतु लोक हुषार आहेत. ते बरोबर सर्वांचा हिशोब चुकता करतील. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन-योगेश वसंत त्रिवेदी, (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).