सुमारे पंधरा हजार कामगारांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा कोविड भत्ता नाही ; बेस्टमध्ये असंतोषाचा वणवा
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सुमारे पंधरा हजार कामगारांना कोविड भत्ता म्हणून प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु गेल्या चार पाच वर्षांपासून हे पंधरा हजार कर्मचारी प्रत्येकी पन्नास हजार रुपये मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. कोविड काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना कामावर जाण्यायेण्यास जीवावर उदार होऊन मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सुमारे पंधरा हजार कामगारांनी सेवा दिली. त्याबद्दल प्रोत्साहन म्हणून प्रति दिन तीनशे रुपये विशेष भत्ता घोषित केला होता.
परंतु उपक्रमाने गेल्या चार-पाच वर्षांत बेस्ट कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता देण्यापासून वंचित ठेवले आहे. विधानपरिषद आमदार श्री प्रसाद लाड पुढाकार घेऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 26 जुलै 2024 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहामध्ये मोठा गाजावाजा करून एका समारंभात बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक श्री अनिल डिग्गीकर यांच्याकडे 78 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला होता. परंतु अजूनही बेस्ट कामगारांना कोविड भत्त्याचे वाटप झालेले नाही. त्यामुळे बेस्ट कामगारांची फसवणूक झाल्याची भावना कामगारांमध्ये पसरली आहे. अशा प्रकारामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा बेस्ट कामगारांमध्ये मलीन होत असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते श्री महेश दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे.