अष्टपैलू लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन
क्रिकेटचा सामना आपल्या लेखाने जिवंत करणारे, आपल्या नजाकतभर्या शैलीने वाचकांना प्रवासवर्णनातून जगभ्रमंती घडवून आणणारे, आपल्या मिश्किल शैलीत सिनेमा आणि सिनेकलाकारांचे चकचकीत विश्व उभे करणारे आलराऊंडर व्यक्तिमत्व, ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, प्रसिद्ध सिनेनिवेदक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे सन्मानिय सदस्य द्वारकानाथ संझगिरी यांची कर्करोगाविरुद्ध सुरु असलेली झुंज अखेर आज अपेशी ठरली. आज सकाळी त्यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी लिलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मुंबई महानगर पालिकेत सिव्हिल इंजीनियर म्हणून कार्यरत असूनही संझगिरी यांनी आपल्या क्रिकेटप्रेमामुळे वर्तमानपत्रात क्रीडा समीक्षक म्हणून गेली पाच दशके गाजवली. त्यांनी क्रीडा पत्रकारितेत सक्रिय राहात हिंदुस्थानी क्रिकेटचे ओघवत्या आणि विश्लेषणात्मक वृत्तांकन करत अवघ्या क्रिकेट विश्वात आपला चाहतावर्ग निर्माण केला. संझगिरी हे हिंदुस्थानी संघाला १९८३ आणि २०११ साली जगज्जेतेपद उंचावताना पाहणार्या मोजक्या क्रीडा पत्रकारांपैकी एक होते. गेल्या पाच दशकांत क्रिकेट जगताची मुशाफिरी करताना त्यांनी कसोटी क्रिकेट खेळणार्या सर्व देशांचा दौरा केला.
सलग ११ वर्ल्ड कपचे रिपोर्टिंग
१९८३ साली कपिल देवच्या हिंदुस्थानी संघाला वर्ल्ड कप उंचावताना पाहाण्याचे भाग्य ज्या मोजक्या पत्रकारांना लाभले, त्यात संझगिरीही होते. त्यानंतर गेली चार दशके त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कपचे रिपोर्टिंग करण्याचा पराक्रम केला. सलग ११ वर्ल्ड कप रिपोर्टिंग करणारे ते एकमेव पत्रकार. यानिमित्ताने क्रिकेटच्या भ्रमंतीसह त्यांनी जगभ्रमंतीही केली आणि त्यानंतर प्रवासवर्णनांच्या माध्यमातून आपल्या वाचकांना जगाची सफर घडवून आणली. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कपसोबत दहावेळा हिंदुस्थान-इंग्लंड कसोटी मालिकेसाठी इंग्लडचा दौराही केला.
संझगिरीचे पुस्तकांचे अर्धशतक हुकले
द्वारकानाथ संझगिरी यांनी आपल्या पत्रकारितेची पन्नाशी साजरी केली, मात्र त्यांच्या पुस्तकांचे अर्धशतक हुकले. त्यांची ४० पुस्तके आतापर्यंत प्रकाशित झाली असून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरवर लिहिलेले पुस्तक सर्वात खास आहे.
त्यांनी आपल्या कारकीर्दीत खेलंदाजी, दशावतार, माझी बाहेरख्याली, चॅम्पियन्स, थेम्सच्या किनार्यावरुन, देव आनंद : के दिल अभी भरा नहीं, शतकांत एकच सचिन, क्रिकेट कॉकटेल, वल्ली आणि वल्ली, अश्रूं आणि षटकार, जिन अँड टॉनिक, शॅम्पेन क्रिकेट, फाळणीच्या देशात, फिरता फिरता, दादर – एक पिनाकोलाडा, अफलातून अवलिये, खुल्लम खिल्ली, प्यार का राग सुनो : देवआनंद ते शाहरुख खान एक रोमँटिक प्रवास, इंग्लिश ब्रेकफास्ट, ब्लु लगून अशी एकापेक्षा एक अशी पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या काही पुस्तकांचे पुनर्प्रकाशनही केले जाणार आहे.
