भ्रष्टाचार प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेना २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
मुंबई – राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना २ वर्षांचा कारावास आणि५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १९९५ मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन तासांतच कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला. माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झाला असला, तरी त्यांना पुढील 30 दिवसांत सत्र न्यायालयात अपील करावे लागणार आहे
१९९५ मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपांवरून हा निर्णय देण्यात आला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी १९९५ मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकांच्या घोटाळ्यांसंदर्भात याचिका दाखल केली होती. आमच्याकडे घर नाही आणि आमचे उत्पन्न कमी असल्याचे सांगून माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांनी मुख्यमंत्री निधीतील सदनिका घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावर भादंवि कलम ४२० (फसवणूक), ४६५ (कृत्रिम दस्तऐवज तयार करणे), ४७१ (बनावट दस्तऐवजाचा उपयोग करणे) आणि ४७४ (सत्यता लपवणे) या कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता.30 वर्षांनंतर या खटल्याचा आज नाशिक जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. त्यानुसार माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनिल कोकाटे यांना २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या सुनावणीला माणिकराव कोकाटे स्वतः जिल्हा न्यायालयात हजर होते. जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठावताच माणिकराव कोकाटे यांच्याकडून तत्काळ जामीन मिळण्यासंदर्भात हालचारी सुरू झाल्यात आहेत. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.
