ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

नैतिकता गेली चुलीत


ज्या क्षेत्रात खोटे बोलने,फसवेगिरी करणे, लुबाडनुक करणे , कोणत्याही मार्गाने निवडणुका जिंकून सत्तेमध्ये जाणे हेच प्रमुख निकष आहेत. त्या क्षेत्राबाबत नैतिकतेची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे? पण तरीसुद्धा काही लोक राजकारणांकडून नैतिकतेची अपेक्षा करतात. एक काळ असा होता की राजकारण्यांमध्ये नैतिकता होती. म्हणून तर रेल्वे अपघातानंतर तात्कालीन रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आजच्या मंत्रांवर दरोड्याचे भ्रष्टाचाराचे, बलात्काराचे,जनतेला धमकावण्याचे किती जरी आरोप झाले, तरी कोणीही नैतिकता दाखवून आपल्या पदाचा राजीनामा देत नाही. किंवा जो कोणी मुख्यमंत्री असतो त्याच्याकडेही नैतिकता नसल्याने तोही अशा भ्रष्ट मंत्राला किंवा गुन्हेगार मंत्राला आपल्या मंत्रिमंडळातून काढून टाकत नाही .महाराष्ट्रापुरतं बोलायचं झाल्यास सध्या सरकारमधील दोन मंत्र्यांवर राजीनामासाठी प्रचंड दबाव आहे. त्यापैकी धनंजय मुंडे यांच्यावर तर हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या, आणि खंडणी प्रकरणात सध्या तुरुंगवासात असलेल्या आरोपीची पाठराखण केल्याचा आरोप आहे. परंतु अनेक वेळा त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊन सुद्धा ते राजीनामा द्यायला तयार नाहीत .कारण त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना धनंजय मुंडे गुन्हेगार वाटत नाहीत .जोपर्यंत त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेणे योग्य ठरणार नाही असं त्यांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. ठीक आहे धनंजय मुंडे यांच्यावरअसलेले आरोप सिद्ध झाले नाहीत म्हणून ते राजीनामा देऊ शकत नाहीत.हे जरी एक वेळ खरे मानले, तरी मग कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे काय ?त्यांना तर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजाराचा दंड ठोठावला आहे. मात्र तरीही ते राजीनामा द्यायला तयार नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नैतिकतेच्या गप्पा मारणारे भाजपवाले आज सत्तेत आहेत पण त्यांनाही माणिकराव कोकाटे दोषी असल्याचे वाटत नाही.न्यायालयाने दोषी ठरवले तरीही जर सत्ताधारी पक्षातल्या मोठ्या नेत्यांना कोकाटेंचा राजीनामा घ्यावासा वाटत नसेल, तर मग कोकाट्याने आणखी काय करायला हवे होते? म्हणजे त्याचा राजीनामा घ्यावा असे मुख्यमंत्र्यांना वाटेल. अर्थात मुख्यमंत्र्यांबाबत अशा कोणत्याही अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल. कारण हेच मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध आपल्याकडे गाडीभर पुरावे आहेत असे सांगत होते. आज कुठे गेली त्यांची ती गाडी आणि कुठे गेले त्यांचे ते पुरावे? हे लोकअसेच असतात. म्हणून त्यांच्यावर लोकांचा विश्वास नसतो. परिणामी चांगले सुशिक्षित घरंदाज,विचारवंत व बौद्धिक दृष्ट्या सक्षम असलेले लोक राजकारणात येत नाहीत. लोकशाहीची हीच मोठी शोकांतिका आहे. माणिकराव कोकाटे न्यायालयात दोषी ठरून सुधा जर मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार नसतील ,तर कुठल्याही राजकारणावर भविष्यात कसलेही आरोप झाले तरी त्याचा राजीनामा मागण्याची सोय उरणार नाही. वास्तविक न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा स्वतःहून द्यायला हवा होता. पण तेवढे जर ते प्रामाणिक असते तर राजकारणात आलेच नसते. किंवा त्यांचे जे कोणी नेते आहेत ते सुद्धा त्यांच्यासारखेच असल्यामुळे, माणिकराव कोकाटे यांचा दोष त्यांना दिसत नाही. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा ते घेऊ शकत नाहीत.आणि कुठल्या तोंडाने घेतील, ते स्वतःही तसेच आहेत .त्यांच्यावरील वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप झालेत .मग जे लोक स्वतःच वेगवेगळ्या प्रकरणात आरोपी आहेत त्यांना दुसऱ्याचा राजीनामा घेण्याचा अधिकारच नाही. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या विषयी बोलताना, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नुकतेच एक विधान केलेले आहे .त्यांनी म्हटले आहे की ज्या मंत्र्यांवर आरोप झालेले आहेत त्यांनी स्वतःहून मंत्री पदाचा राजीनामा द्यायला हवा. अण्णा आयुष्यभर भ्रष्टाचाराविरुद्ध लढले .पण दुर्दैवाने त्यांच्याही चेल्या चपाट्यानीच अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेला सुरुंग लावला .त्यात केजरीवाल सारखे त्यांचे चेले तर बदनाम झालेच .पण त्या बदनामीचे शिंतोडे अण्णांच्याही धोतरावर उडाले. त्यामुळे आता अण्णांनी राजकारण्यांना नैतिकता शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. उतार वयात राळेगणसिद्धीत उरलेलं आयुष्य शांतपणे जगावे. कारण भ्रष्टाचारी लोक स्वतः तयार होत नाहीत .त्यांना जनताच तयार करते .भ्रष्टाचारी लोकांच्या मागे जेव्हा जनता भरकटत जाते ,तुरुंगातून भ्रष्टाचारी नेता जामिनावर बाहेर आल्यावर जेव्हा लोक त्यांची मिरवणूक काढतात ,तेव्हा जनतेला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकारच राहिलेला नसतो .ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. त्यामुळेच माणिकराव कोकाटे सारखे नेते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयात दोषी ठरले तरीसुद्धा राजीनामा द्यायला तयार नाहीत.त्याचबरोबर त्यांच्या मतदारसंघातील ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलेले आहे ,ते लोक सुद्धा कोकाट्यांचा राजीनामा मागायला तयार नाहीत. हे सगळं भयंकर आहे .राजकारणी आणि राजकारणाची वाटचाल दिवसेंदिवस हुकूमशाहीच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यांना आता रोखणे कठीण आहे. जोवर भ्रष्टाचारी नेत्यांच्या अवतीभवती बिनडोक अंधभक्तांची फौज आहे .तोपर्यंत धनंजय मुंडे किंवा माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या नेत्यांना कुणाचेही भय राहणार नाही. ते राजकारणात कालही होते, आजही आहेत ,आणि भविष्यातही राहतील. काल-परवापर्यंत ते जनतेचे ऐकत नव्हते. आता न्यायालयालाही जुमानायला तयार नाहीत. आणि इथेच लोकशाहीची घटका भरली असे म्हणायला हरकत नाही. विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले की निवडणुका कशा जिंकल्या जातात. जर निवडणुका भ्रष्ट मार्गाने जिंकल्या जात असतील, तर भ्रष्ट मार्गाने निवडून येणाऱ्या नेत्याने सत्तेत राहून भ्रष्टाचार केल्यास कुठे बिघडले ?त्यामुळे लोकांनी आता भ्रष्टाचारावर बोलण्याएवजी, राजकारण्यांची गुलामी निमुटपणे स्वीकारावी. आणि त्यांची मनमानी सहन करावी .लोकशाही वगैरे आता काही राहिलेले नाही. आपण सर्व राजकारण्यांच्या हुकूमशाही मध्ये जगतोय हेच लक्षात ठेवून गप्प राहावे .त्यातच आपले आणि आपल्या कुटुंबाचे भले आहे.

error: Content is protected !!