भिवंडीत खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघात ; तीन जण जखमी
भिवंडी दि. २२( आकाश गायकवाड ) भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी येथील रस्त्याची सध्या दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर सध्या मोठं मोठे खड्डे पडल्याने अनेक अपघात घडत आहेत. रविवारी पती व दिड वर्षाच्या मुली सोबत रक्षाबंधानासाठी माहेरी जाणाऱ्या महिलेच्या पतीची दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात आदळल्याने अपघात झाल्याची घटना पायगाव येथे दुपारी घडली आहे. या अपघातात माहिलेसह पती व दिड वर्षांची मुलगी असे तीन जण जखमी झाले असून या तिघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
सुशीला संदेश गोऱ्हे ( वय २१ ) संदेश गोऱ्हे (२६ ) व त्यांची दिड वर्षांची एक मुलगी वैभवी असे खड्ड्यांमुळे जखमी झालेल्यांची नावे असून ते कामण येथील रहिवासी आहेत. आज रक्षाबंधनाचा सण असल्याने जखमी सुशीला गोऱ्हे या आपल्या माहेरी पायगाव ब्राम्हणपाडा येथे पती व मुलीसह दुचाकीवरून येत होत्या त्यावेळी पायगाव जवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये दुचाकी आदळल्याने तिघेही गाडीवरून खाली पडले . झालेल्या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले असून तिघांनाही स्थानिकांच्या मदतीने अंजुरफाटा येथील खासगी रुगणालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सुमारे एक तास जखमी महिला व तिचे पती रस्त्यावरच होते. रुग्णालयात नेण्यासाठी सुप्रीम इन्फ्रा टोल कंपनीची रुग्णवाहिका देखील याठिकाणी अली नव्हती. स्थानिक रिक्षा वाल्याच्या मदतीने हितेश तांगडी यांनी महिला व तिच्या जखमी पतीला खारबाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले मात्र जखम जास्तअसल्याने पुढील उपचारासाठी अंजुरफाटा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
विशेष म्हणजे मानकोली अंजुरफाटा चिंचोटी या रस्त्याकडे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबरच टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीचे पुरता दुर्लक्ष असल्याने या रस्त्याची सध्या दुरावस्था होऊन अशा प्रकारचे अपघात रोज घडत आहेत. मागच्या आठवड्यात स्थानिकांनी या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत रास्ता रोको आंदोलन केले होते तर दिन दिवसांपूर्वी रस्त्याच्या दुरावस्था झाल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा टोल नाका देखील फोडला होता. रस्त्यावर खड्डे असूनही टोल कंपनी टोल वसुली मात्र नियमित करीत असल्याने स्थानिकांमध्ये रस्त्याच्या दुरावस्थे बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व सुप्रीम कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.