डॉ.महेंद्र कल्याणकर रायगड जिल्हाधिकारीपदी रुजू! ठाणे, चंद्रपुर, अकोला येथे केले वैशिष्ट्यपूर्ण काम! मावळत्या जिल्हाअधिकाऱ्यांनी केले स्वागत!
रायगड(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी सौ.निधी चौधरी यांची बदली झाल्याने रायगड जिल्हाधिकारी पदाची सुत्रे आज डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी स्वीकारली आहेत. रायगडचा पुर्व जिल्हाअधिकारी सौ. निधी चौधरी यांनी आज रायगड जिल्हाअधिकारी पदी रुजु झालेले नवीन जिल्हाअधिकारी डॅा. महेंद्र कल्याणकर यांचे स्वागत केले आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी डॅा. महेंद्र कल्याणकर यांनी कामगार आयुक्त म्हणून काम केले आहे. भाप्रसे तील 2007 बॅचचे डॉ.महेंद्र कल्याणकर यांचा यापूर्वी ठाणे जिल्हाधिकारी असताना दोनदा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला असल्याची माहीती जिल्हा माहीती कार्यालयातून देणेत आली आहे.
या बाबत रायगड जिमाका कार्यालयातून देणेत आलेल्या माहीतीनुसार ठाणे येथे जिल्हाधिकारी असताना अल्पावधीतच डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यात महसूलवाढीसाठी केलेले प्रयत्न, माहिती तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून जनतेला दिलेली शासकीय सेवा, त्याचप्रमाणे प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज, पिक कर्जवाटपात केलेली लक्षणीय वाढ, जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभागातून केलेली कामे, शासकीय जत्रेसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून एकाच ठिकाणी केलेले काही लाख दाखल्यांचे वाटप, जिल्हा प्रशासनाचे पहिले कौशल्य विकास केंद्र, सर्वाधिक पेसा गावांसाठी केलेले प्रयत्न या कामांची दखल घेऊन हा विशेष गौरव रायगडचे नवीन जिल्हाअधिकारी यांचा करण्यात आला आहे.
ठाणे येथे जिल्हा प्रशासनाचे कौशल्य विकास केंद्र सुरू करून त्यांनी इतर जिल्ह्यांसमोर आदर्श ठेवला होता. या केंद्रातून अनेक गरीब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील मुलांमुलीनी प्रशिक्षण घेतले व त्यांना नोकऱ्याही लागल्या होत्या. ठाण्यातच जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने एक दिवसभरासाठीच्या सर्वात मोठे नेत्र चिकित्सा शिबिर त्यांनी आयोजित केले होते , या शिबिरात विशेषत: ग्रामीण भागातून शेकडो नागरिकांनी मोफत तपासणी करून घेतली होती. शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांर्गत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला ‘डिजिटल चॅम्पियनशिप’ डॉ. कल्याणकर यांनी प्राप्त करून दिली. याशिवाय अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या रेतीमाफियांवर सडेतोड कारवाई करून राज्यात सर्वाधिक दंड वसुली त्यांनी करून दिली होती.
दरम्यान ठाणे जिल्ह्यातील दूर्गम भागात कातकरी लोकांना शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांना ओळख देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कोकण विभागातील हजारो कातकरी कुटुंबांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष तत्काळ लाभ मिळाला. “कातकरी उत्थान योजना” या योजनेत ठाणे जिल्ह्याची कामगिरी त्यामुळे प्रशंसनीय झाली.जलयुक्त शिवार योजना खेडोपाडी पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक ठिकाणी फायदा झाला. बँका आणि वित्तीय संस्थांना कर्ज थकबाकी वसूल करणे सोपे जावे म्हणून जिल्हाधिकारी म्हणून सरफेसी कायद्यात आपल्या अधिकाराचा उपयोग करून या संस्थाना त्यांनी मोठा दिलासा दिला आहे. तसेच कामगार आयुक्त म्हणून देखील त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा झाली. औद्योगिक सुरक्षेविषयी त्यांनी जागृती निर्माण केली होती तसेच याविषयी सोप्या भाषेत संबंधित उद्योग-आस्थापना व कामगार यांना माहिती देणारे आकर्षक कॉफी टेबल बुकही जिल्हाअधिकारी डॅा. मेहेंद्र कल्याणकर यांनी तयार केल्याची माहीती मिळाली आहे.
Photo caption;-
रायगडचा मावळत्या जिल्हाअधिकारी सौ. निधी चौधरी रायगड जिल्हा अधिकारी पदाची सुत्रे नवीन जिल्हा अधिकारी डॅा. महेद्र कल्याणकर यांच्याकडे सोपविताना छायाचित्रांत दिसत आहेत.