औरंगजेबाचे फोटो झळकावणे सहन केले जाणार नाही -फडणवीस
अहिल्या नगर – अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात औरंगजेबाचा फोटो घेऊन काही तरुणांनी डान्स केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार नगर शहरातील फकीरवाडा परिसरात घडला. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नगर शहरातील फकीरवाडा परिसरात संदल उरूस उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाच्या मिरवणुकीत काही तरुण औरंगजेबाचा फोटो घेऊन डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराची दखल थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यानंतर याप्रकणी भिंगार कॅम्प पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार रविवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे नगर शहरातील वातावरण तापलं आहे. नगरमधील या प्रकाराची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली.
फडणवीस म्हणाले, “औरंगजेबाचा फोटो झळकवणं हे सहन केलं जाणार नाही. तर कुणी औरंगजेबाचे फोटो झळकवत असेल तर ते मान्य केलं जाणार नाही. या देशात आणि महाराष्ट्रात आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. जर कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी नाही”, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा देताच औरंगजेबाचा फोटो घेऊन डान्स करणाऱ्या तरुणांवर भिंगार कॅम्प पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.