नियतीचा क्रूर खेळ !
काळीज चिरत जाणारा टाहो तेजस्वी कन्या यश्वीने फोडला आणि आजोबा विनोदजींनी त्या नऊ वर्षाच्या नातीच्या डोक्यावर हात फिरवून आपल्या अश्रूंना वाट qमोकळी करून दिली. या आसवांचा ‘अभिषेक’ होत होता आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला होता. दिवाकर रावते, विजय दारुवाले, भाई विलास पोतनीस अशा असंख्य सहकाऱ्यांनी विनोद घोसाळकर यांना सावरण्याचा प्रयत्न केला. चार वर्षांचा सतेज आपल्या आई आणि आजीकडे आळीपाळीने पहात होता. त्या बिचाऱ्याला काही कळत नव्हते. संपूर्ण खोलीतले वातावरण शोकसागरात बुडाले होते. एक राजबिंडे, हसतमुख युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले होते आणि त्याचे पार्थिव काचेच्या पेटीत पुढच्या प्रवासाची प्रतीक्षा करीत होते. या ९ वर्षाच्या यश्वी आणि ४ वर्षाच्या सतेजचा काय दोष होता ? त्यांनी काय गुन्हा केला होता की, ही कठोर शिक्षा देत नियतीने या लेकरांबरोबर अत्यंत क्रूर चेष्टा केली होती. शिवसेना उपनेते आणि मुंबई घर दुरुस्ती मंडळाचे माजी अध्यक्ष विनोद घोसाळकर हे आपली नित्यकर्मे उरकून शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या समवेतच्या एका कार्यक्रमासाठी निघाले होते. अभिषेक घोसाळकर हे आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री येथे गेले. तिथे चर्चा करुन बोरीवली येथे पोहोचले. अभिषेक आणि विनोद घोसाळकर यांचा भ्रमणध्वनीवर संपर्क सुरुच होता. सौ. तेजस्वी अभिषेक घोसाळकर याही घरातली कामं हातावेगळी करुन हळदीकुंकू आणि साडीवाटप या कार्यक्रमांसाठी औदुंबर येथून बाहेर पडल्या होत्या. बोरीवली पश्चिम येथील आय सी कॉलनीत अभिषेक यांचे कार्यालय असून ते आपल्या कार्यालयाकडे निघाले. इतक्यात मॉरिस नरोन्हाने त्यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. भोळ्या भाबड्या अभिषेकने विश्वास ठेवून मॉरिसचे कार्यालय गाठले. आता आपण एकत्रितपणे काम करुन आय सी कॉलनीत विकासाची, प्रगतीची वाटचाल करु या, आपण फेसबुक लाईव्ह वरुन येथील नागरिकांना आपल्या एकत्रित कामाची माहिती देऊ या, असे मॉरिस नरोन्हाने सांगितले. अभिषेक आय सी कॉलनीत विकासाची गंगा आणण्यासाठी भगीरथ होऊन विश्वासाने पुढे निघाला. पण त्याला काय माहित की यमराजाच्या रुपात कोण मॉरिस नरोन्हाच्या कार्यालयाबाहेर दबा धरून बसलाय. भोळसटपणाने सर्वं संवादात भाग घेऊन अभिषेक उठतोय तोच धाड धाड अशा एक दोन तीन चार आणि पाच गोळ्यांनी त्याच्या शरीराचा वेध घेतला होता. अतीशय करुण परिस्थितीत अभिषेकला करुणा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. विनोद घोसाळकर यांना गोळीबाराची वार्ता कळताच त्यांनी करुणा हॉस्पिटलकडे धाव घेतली. वैद्यकीय अधिकारी सारे प्रयत्न करीत होते पण अभिषेकने इहलोकीची यात्रा आधीच संपवली होती. नियतीने काय खेळ मांडला होता. मुलाचे पार्थिव समोर असतांना सारे दुःख गिळून विनोद घोसाळकर यांनी अभिषेकचे पार्थिव दहिसर स्पोर्ट्स फौंडेशनच्या सभागृहात ठेण्याच्या सूचना देत अभिषेक माऊली सौ. वैभवी, सून तेजस्वी आणि कुटुंबियांना अभिषेक आपल्यात आता नाही, याची कुणकुण लागू दिली नाही. जे जे रुग्णालयात पुढचे सोपस्कार पार पाडून पार्थिव औदुंबर येथे आणण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करीत बोरीवलीला धाव घेतली. शिवसेनेचे तमाम नेते, उपनेते, पदाधिकारी औदुंबर परिसरात मोठ्या संख्येने जमले. शोकाकुल वातावरणात अभिषेक घोसाळकर या राजबिंड्या, सदैव हसतमुख अशा युवा नेतृत्वाला साश्रुनयनांनी निरोप दिला. या संपूर्ण दु:खमय परिस्थिती दरम्यान गलिच्छ असे आरोप करण्यात येऊन घोसाळकर यांच्या राजकीय, सामाजिक जीवनाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न काही नतद्रष्ट लोकांनी केला. विनोद घोसाळकर यांनी प्रसंगावधान राखून या संदर्भात एक निवेदन प्रसृत केले आहे. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य आणि बिनबुडाचे आरोप करून माझी, माझ्या मुलाची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हिडीस प्रकार सुरू आहे. असे खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तत्काळ थांबवा.
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची बोरिवलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर घोसाळकर यांच्याबाबत आक्षेपार्ह बाबी पसरवल्या जात असून एका निवेदनाद्वारे अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी हा किळसवाणा प्रकार थांबवण्यासाठी बजावले आहे. ‘१९८२ पासून मी सक्रिय राजकारणात आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्राचे तंतोतंत पालन करत आहे. मी आणि माझा पुत्र अभिषेक आम्ही निरपेक्षपणे आणि निष्ठेने समाजकारण आणि राजकारण केले आहे. शिवरायांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. निष्कलंकपणे आम्ही सामाजिक जीवनात वावरत आहोत, कोणताही डाग आमच्यावर नाही. मी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलो. नंतर विधानसभेवर निवडून गेलो. मुलगा अभिषेक, सून तेजस्वी हेसुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आले. जनतेचे प्रेम आणि विश्वास आम्हाला मिळाला. त्याला आम्ही कधीही तडा जाऊ दिला नाही. जनतेची आम्ही नि:स्वार्थपणे सेवा केली, असे घोसाळकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने झालेली हत्या हा आमच्यावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य असे बिनबुडाचे आरोप करून आमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार सुरू आहे. ही बदनामी कृपा करून तत्काळ थांबवा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे, अशा तीव्र भावना घोसाळकर यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केल्या आहेत. -योगेश वसंत त्रिवेदी, (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)